कर्करोगाचे उपचार आजही सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर?

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
National Cancer Awareness Day 2026कर्करोग म्हटलं की मृत्यूची भीती, उपचारांचा प्रचंड खर्च आणि कुटुंबाची होणारी आर्थिक ओढाताण डोळ्यांसमोर येते. पण कर्करोगापेक्षा धोकादायक आहे तो या आजाराबद्दलचा अज्ञानाचा अंधार! भारतात दरवर्षी लाखो नागरिकांना कर्करोगाचे निदान होत असताना महाराष्ट्र देशातील सर्वाधिक कर्करोग रुग्णसंख्या असलेल्या राज्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तंबाखू, गुटखा, धूम्रपान, बदलती जीवनशैली आणि पर्यावरणीय घटकांबरोबरच वेळेवर निदान न होणे हेही मोठे आव्हान आहे. राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनाच्या निमित्ताने प्रश्न केवळ कर्करोग किती वाढतोय हा नाही, तर सामान्य माणसाला वेळेवर तपासणी आणि परवडणारे उपचार मिळतात का, हा आहे.
 

cancer 
 
दरवर्षी ७ नोव्हेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो. २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या दिवसाची घोषणा केली. कर्करोगाचे लवकर निदान, प्रतिबंध आणि उपचार याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञ मॅरी क्युरी यांचा ७ नोव्हेंबर हा जन्मदिवस असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. मात्र दरवर्षी जागरूकता दिन साजरा करूनही कर्करोगाचा वाढता धोका कमी करण्यात आपल्याला कितपत यश मिळत आहे? आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते आहे का? ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर निदान आणि उपचार मिळतात का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे.
 
देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. ही आकडेवारी केवळ आरोग्य विभागासाठी चिंतेची बाब नाही, तर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोरील मोठे आव्हान आहे. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाचा संघर्ष सुरू होतो. उपचारांचा खर्च, रुग्णालयांपर्यंतचे अंतर, वारंवार कराव्या लागणाऱ्या तपासण्या आणि रोजगारावर होणारा परिणाम यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटते.