बांगलादेशात टागोरांच्या चित्राची विडंबना

कट्टरवाद्यांनी लावले पोस्टर, भारताची स्तुती करणाऱ्यांना स्थान नाही, हिंदू समुदायात संताप

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
ढाका, 
Parody of Tagore’s paintings in Bangladesh बांगलादेशातील खुलना येथे अज्ञात व्यक्तींनी नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या भित्तिचित्राला काळी शाई लावून विडंबना केली. याशिवाय कट्टरवाद्यांनी भारताची स्तुती करणाऱ्यांना देशात स्थान नाही आणि भारतीय महापुरुषांचे कौतुक करणाऱ्यांनी देशाबाहेर जावे, अशा आशयाचे पोस्टर लावल्याने हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणाची दखल घेतली नाही. टागोर यांचे हे चित्र खुलना रेल्वे स्थानकाच्या बाहेरील भिंतीवर लावण्यात आले होते. त्याच भिंतीवर या प्रदेशाच्या कला, साहित्य आणि संस्कृतीमध्ये योगदान देणाऱ्या इतर प्रमुख व्यक्तींची चित्रेही होती. फकीर लालन शाह, चित्रकार एस. एम. सुलतान, काझी नझरुल इस्लाम, माजी पंतप्रधान खालेदा झिया, माजी राष्ट्रपती झियाउर रहमान आणि मायकल मधुसूदन दत्त यांची चित्रेही त्याच भिंतीवर होती, परंतु त्यांना कोणतेही नुकसान झाले नाही. 
 
 
Parody of Tagore’s paintings in Bangladesh
 
 
 
मात्र समाजकंटकांनी टागोर यांच्या चित्राला लक्ष्य करत त्याला काळे फासले. इतकेच नव्हे तर, भारताची स्तुती करणाऱ्यांना स्थान नाही आणि भारतीय महापुरुषांचे कौतुक करणाऱ्यांनी देशाबाहेर जावे, असे पोस्टर लावले. पंतप्रधान तारिक रहमान यांच्या खुलना दौऱ्यापूर्वी महापालिकेने ही कलाकृती तयार करून घेतली होती. शुक्रवारी सकाळी, टागोर यांच्या चित्राची विटंबना करण्यात आल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी टोगोर यांचे चित्र हटवले. यानंतर हिंदू संघटनांनी आक्षेप घेत निदर्शने केली. चित्राची विटंबना करणारे आणि भारताविषयी आक्षेपार्ह पोस्टर लावणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
 
 

तपास सुरू कारवाई नाही
खुलना सदर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी लोकमान हुसेन यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही टागोर यांचे चित्र आणि भारताविषयी लावण्यात आलेले आक्षेपार्ह पोस्टर हटवले आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली, तथापि अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आली नाही. हिंदू संघटनांनी या घटनेमागे कट्टरपंथी संघटनांचा हात असल्याचा आरोप केला आहे. मात्र प्राथमिक तपासात यासंदर्भात पुरावे सापडले नाही.
 
 
संकुचित, विकृत मानसिकता उघड
केसीसी प्रशासक नझरुल इस्लाम मंजू यांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त करताना म्हटले की, ही चित्रे मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये स्वतंत्र विचारसरणीला प्रोत्साहन देण्यास मदत करणारी आहे. चित्राची विटंबना करून, कट्टरपंथीयांची संकुचित वृत्ती आणि विकृत मानसिकता उघड झाली आहे. नाट्य लोकचे सांस्कृतिक कार्यकर्ते आणि सरचिटणीस शरीफुल इस्लाम सलीम यांनी म्हटले की, हा प्रकार एका संघटित गटाने केला. त्यांनी ढाकामध्ये अशाच प्रकारची कृत्ये केली. या घटना हेतुपुरस्सर घडवून आणल्या जात आहेत. जबाबदार लोकांना ओळखून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. हे प्रकरण फक्त रवींद्रनाथांपुरते मर्यादित ठेवता येणार नाही. ते इतर प्रसिद्ध व्यक्तींनाही लक्ष्य करू शकतात.