ई-२० इंधनावरून राहुल गांधींचा हल्लाबोल!

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
rahul-gandhi पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या ई-२० (E20) धोरणावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या धोरणावरून केंद्र सरकारला लक्ष्य करत वाहनधारकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप केला आहे. ‘ई-२० नव्हे, तर हे ४२० इंधन आहे,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या इंधन धोरणावर टीका केली. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असून इंधनाची सरासरी कमी झाल्याने सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा दावा त्यांनी केला.

rahul-gandhi
 
आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ राहुल गांधी यांनी कर्नाटकातील पेट्रोलच्या नमुन्यांच्या प्रयोगशाळा तपासणी अहवालांचा उल्लेख केला. त्यांच्या दाव्यानुसार, कर्नाटकातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून घेतलेल्या पेट्रोलच्या १४ नमुन्यांपैकी ११ नमुन्यांमध्ये इथेनॉलचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक आढळले आहे. या तपासणीत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, नायरा आणि शेल या कंपन्यांच्या पेट्रोलच्या नमुन्यांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. काही नमुन्यांमध्ये इथेनॉलचे प्रमाण ३० टक्क्यांहून अधिक असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सरकारच्या नियंत्रण व्यवस्थेबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. देशभरात विकल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये नेमके किती प्रमाणात इथेनॉल मिसळले जात आहे आणि त्यावर सरकारचे किती नियंत्रण आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक इथेनॉल मिसळणाऱ्या तेल कंपन्यांवर सरकार कारवाई करणार की नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला. नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई कधी केली जाणार, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या या आरोपांमुळे ई-२० इंधन धोरण, वाहनांची कार्यक्षमता आणि पेट्रोलमधील इथेनॉलच्या प्रमाणावरून केंद्र सरकारसमोर नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.