नाशिक,
Railways geared up for Kumbh Mela आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांची प्रवासकोंडी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. कुंभमेळ्याच्या काळात नियमित रेल्वेसेवांव्यतिरिक्त २४ विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या अमृतस्नानाच्या साधारण आठवडाभर आधी या विशेष गाड्या सुरू करण्याची योजना आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी कसबे सुकेणे, खेरवडी, ओढा, नाशिकरोड आणि देवळाली या पाच स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन या पर्यायी स्थानकांच्या माध्यमातून केल्यास एकाच ठिकाणी प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता कमी होईल. कुंभमेळ्याच्या काळात रेल्वेने येणाऱ्या आणि परतीचा प्रवास करणाऱ्या भाविकांना अधिक सुलभ सुविधा देणे, हा या नियोजनामागील प्रमुख उद्देश आहे.

प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी कसबे सुकेणे, खेरवडी, ओढा आणि देवळाली या चार स्थानकांच्या पश्चिम बाजूला प्रत्येकी सुमारे सहा हजार भाविक एकाच वेळी थांबू शकतील, अशी प्रशस्त आणि पक्की व्यवस्था उभारली जाणार आहे. कुंभस्नानानंतर परतणाऱ्या भाविकांना या ठिकाणी नियंत्रित पद्धतीने थांबवून टप्प्याटप्प्याने रेल्वेगाड्यांमध्ये प्रवेश दिला जाईल. त्यामुळे अचानक वाढणारी गर्दी हाताळण्यास मदत होणार असून, चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय स्थानकांच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंचा स्वतंत्र वापर करण्यात येणार आहे. पूर्वेकडील बाजूने कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना बाहेर पडण्याची सुविधा असेल, तर पश्चिमेकडील बाजूने कुंभक्षेत्रातून परतणाऱ्या भाविकांना स्थानकात प्रवेश दिला जाईल. पूर्व बाजूला एसटी आणि सिटीलिंक बस उपलब्ध असतील, तर पश्चिम बाजूला कुंभक्षेत्रातून येणाऱ्या बस थांबतील. पश्चिमेकडे भाविकांना उतरवल्यानंतर रिकाम्या बस पुन्हा पूर्वेकडे आणून नव्याने आलेल्या भाविकांना कुंभक्षेत्रात पाठविण्याची व्यवस्था असेल. विशेष गाड्यांच्या थांब्यांचेही मार्गानुसार नियोजन करण्यात आले आहे. मुंबई मार्गावरील गाड्या देवळाली, नागपूर मार्गावरील गाड्या ओढा, कर्णावती मार्गावरील गाड्या खेरवडी, तर भोपाळ मार्गावरील गाड्या कसबे सुकेणे स्थानकावर थांबणार आहेत. याच स्थानकांवरून संबंधित गाड्या परतीच्या प्रवासासाठी रवाना होतील.
याशिवाय कुंभमेळ्यादरम्यान एका स्थानकावरून दुसऱ्या स्थानकावर जाणाऱ्या भाविकांसाठी १२ डब्यांची स्वतंत्र रेल्वेगाडी चालविण्याचे नियोजन आहे. या गाडीचे निश्चित वेळापत्रक नसेल. प्रवाशांची संख्या आणि गर्दीची परिस्थिती पाहून तिच्या फेऱ्या ठरविण्यात येतील. देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या भाविकांना एकाच रेल्वेस्थानकावर उतरविण्याऐवजी पाच स्थानकांवर विभागून त्यांची वाहतूक करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. २४ विशेष रेल्वेगाड्या, स्थानकांचा विकास, स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमन व्यवस्था तसेच एसटी व सिटीलिंक बसचे नियोजन यामुळे कुंभमेळ्यातील प्रवासी वाहतूक अधिक शिस्तबद्ध करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र, या सुविधांची वेळेत उभारणी आणि प्रत्यक्ष गर्दीच्या काळात विविध यंत्रणांमधील समन्वय यावर या संपूर्ण नियोजनाचे यश अवलंबून राहणार आहे.