अयोध्या,
record set during Deepotsav in Ayodhya छोटी दिवाळी अर्थात नरक चतुर्दशीच्या निमित्ताने अयोध्येत आज दहाव्या दीपोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण रामनगरी सज्ज झाली असून, सरयू नदीच्या तीरावरील ५६ घाटांवर ३० लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित केले जाणार आहेत. यंदाच्या आयोजनातून दीपोत्सवाचा नवा विक्रम करण्याची तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे २१०० बटुकांच्या सहभागातून होणारी महाआरती आणि २१०० ड्रोनच्या माध्यमातून आकाशात साकारले जाणारे रामायणातील विविध प्रसंग. अयोध्येतील प्रमुख ठिकाणांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, 3D स्क्रीनवर रामायणातील महत्त्वाच्या घटनांचे सादरीकरणही केले जात आहे. या कार्यक्रमाला देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही या सोहळ्याला उपस्थिती असेल.

दीपोत्सवाच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता साकेत डिग्री कॉलेज येथून निघणाऱ्या शोभायात्रेने होणार आहे. दुपारी २ वाजेपर्यंत ही यात्रा रामकथा पार्क येथे पोहोचेल. दुपारी २:१५ वाजता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्या विमानतळावर दाखल होतील, तर २:३० वाजता उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे आगमन होईल. त्यानंतर दोन्ही नेते राम मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. दुपारी ३:२५ ते ३:४० या वेळेत भगवान श्रीराम आणि माता सीतेची वेशभूषा केलेले कलाकार हेलिकॉप्टरमधून रामकथा पार्क येथे पोहोचतील. यावेळी भरत मिलाप सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी ३:५० ते ४:१० दरम्यान राम-जानकी पूजन, आरती आणि श्रीरामांचा प्रतीकात्मक राज्याभिषेक होईल. सायंकाळी ४:२५ ते ४:४० या वेळेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थितांना संबोधित करतील. त्यानंतर सायंकाळी ५:३५ ते ५:५५ या वेळेत नया घाट येथे सरयू नदीची आरती होणार आहे. सायंकाळी ६ ते ६:२५ या वेळेत राम की पैडी येथे दीपप्रज्वलन केले जाईल. त्यानंतर ६:२५ ते ६:५५ या वेळेत 3D प्रोजेक्शन मॅपिंग, रामायणावर आधारित लेझर शो आणि ड्रोन शो सादर होईल. ६:५५ ते ७:०५ या वेळेत मुख्यमंत्री पुन्हा एकदा राम की पैडी येथे भाषण करतील. रात्री ७:४० ते ७:५० या वेळेत फटाक्यांची आतषबाजी होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.
दरम्यान, लाखो भाविक आणि नागरिकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता अयोध्येत सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण शहराची २० झोन आणि ५३ सेक्टरमध्ये विभागणी करून सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. पोलीस दलासह सीआरपीएफ, पीएसी, बॉम्ब शोधक पथके आणि अग्निशमन विभागाला सतर्क ठेवण्यात आले आहे. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरयू नदीचे घाट, राम की पैडी आणि शहरातील प्रमुख मार्गांवर प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक सादरीकरण आणि भव्य रोषणाईच्या माध्यमातून यंदाचा दीपोत्सव संस्मरणीय करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.