मुंबई
mumbai-airport मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचा बदल होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनल-१ च्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासनाने १२ आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांची उड्डाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. मार्च २०२७ मध्ये लागू होणाऱ्या उन्हाळी वेळापत्रकापासून या बदलाची अंमलबजावणी प्रस्तावित आहे. त्यानुसार दररोजची सुमारे १६ आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवी मुंबई विमानतळावरून संचालित होतील. त्यामुळे मार्च २०२७ अखेरपासून संबंधित विमान कंपन्यांच्या प्रवाशांना नवी मुंबई विमानतळावरून प्रवास करावा लागू शकतो.

मुंबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसाठी उन्हाळी हंगामात एकूण ५० विमान कंपन्यांनी स्लॉटची मागणी केली होती. मात्र, यापैकी केवळ ३८ कंपन्यांनाच मुंबई विमानतळावर उड्डाणांसाठी स्लॉट मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित १२ कंपन्यांना मुंबई विमानतळावर आवश्यक जागा उपलब्ध न झाल्याने नवी मुंबई विमानतळावरून सेवा चालवण्याचा पर्याय देण्यात आला आहे. या प्रस्तावित स्थलांतरात प्रामुख्याने आखाती देश आणि आशियाई देशांशी जोडलेल्या विमानसेवांचा समावेश आहे.
या बदलामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीच्या मार्गांमध्येही बदल होणार आहे. प्रस्तावित योजनेनुसार बहरीन, दमाम, ढाका, दोहा, फुजैराह, जकार्ता, जेद्दा, काठमांडू, कुवेत सिटी, मदिना, मस्कत, रास अल खैमाह, रियाध आणि शारजाह या १४ आंतरराष्ट्रीय ठिकाणांसाठी नवी मुंबई विमानतळावरून विमानसेवा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. विशेषतः आखाती देशांमध्ये नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कारणांसाठी नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या बदलाची दखल घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.
दरम्यान, मुंबई विमानतळावरील टर्मिनल-१ च्या पुनर्विकासाचा प्रकल्पही महत्त्वाकांक्षी स्वरूपाचा आहे. सध्या या टर्मिनलची वार्षिक प्रवासी हाताळण्याची क्षमता सुमारे दीड कोटी इतकी आहे. पुनर्विकासानंतर ही क्षमता वाढवून दोन कोटी प्रवाशांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पाचे बांधकाम जानेवारी २०२७ मध्ये सुरू करण्याचे नियोजन असून, मार्च २०२९ पर्यंत विस्तारित आणि आधुनिक टर्मिनल पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे.
या पुनर्विकासामुळे मुंबई विमानतळावरील वार्षिक सुमारे ५० लाख प्रवाशांची वाहतूक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवली जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे दोन्ही विमानतळांवरील प्रवासी व्यवस्थापनाला नवे स्वरूप मिळणार आहे. मात्र, विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, या बदलाचा मुंबई विमानतळाच्या एकूण सध्याच्या प्रवासी वाहतुकीपैकी सुमारे ९१ टक्के वाहतुकीवर परिणाम होणार नाही. टर्मिनल-१ च्या पुनर्विकासासोबतच नवी मुंबई विमानतळाचा वापर वाढवण्याच्या या नियोजनामुळे मुंबई महानगर प्रदेशातील विमान वाहतुकीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे.