कोलकाता,
Restrictions outside Abhishek Banerjee's house तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकाता येथील कालीघाट परिसरातील निवासस्थानाबाहेर पुढील ६० दिवस भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे (BNSS) कलम १६३ लागू राहणार आहे. शुक्रवारी रात्री वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. यापूर्वीही १३ ऑक्टोबरपासून या परिसरात कलम १६३ लागू होते. मात्र, रात्रीच्या घटनेनंतर हे निर्बंध पुढेही कायम ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

या घटनेनंतर अभिषेक बॅनर्जी यांनी शनिवारी भाजप कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले. शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास भाजप समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याचा दावा त्यांनी केला. सलग दोन दिवस त्यांच्या कार्यालयावर आणि घरावर पाळत ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या संघर्षात तृणमूल काँग्रेसचे चार ते पाच समर्थक गंभीर जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी एका कार्यकर्त्याला प्लास्टिक सर्जरी करावी लागणार असून, दुसऱ्या कार्यकर्त्याला फ्रॅक्चर झाले आहे. हल्लेखोरांनी काटेरी सळ्यांनी मारहाण केली तसेच पक्षाच्या स्थानिक कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोपही त्यांनी केला. घटनेच्या वेळी पोलीस उपस्थित असूनही हल्ला रोखण्यात अपयशी ठरल्याचा दावा करत त्यांनी पोलीस आणि न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान, बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप समर्थकांनी 'चोर-चोर' अशा घोषणा दिल्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी आणि वादाला सुरुवात झाली. त्याचे रूपांतर हाणामारी आणि दगडफेकीत झाल्याचे आरोप आहेत. गेल्या सहा महिन्यांत आपल्या हत्येचा हा सातवा प्रयत्न असल्याचा दावा अभिषेक बॅनर्जी यांनी केला. मात्र, भाजपने हे आरोप फेटाळून लावत संघर्षाला तृणमूल काँग्रेसचे समर्थकच जबाबदार असल्याचा प्रत्यारोप केला. पश्चिम बंगालचे पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्री दिलीप घोष यांनीही बॅनर्जी यांचे आरोप फेटाळले. सत्ता हातातून गेल्यानंतर अशा प्रकारचे आरोप करणे सामान्य असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान, दोन्ही गटांमध्ये गोंधळ झाल्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागल्याचे कोलकाता पोलिसांनी स्पष्ट केले.