मुंबई
tulsi hai na मनोरंजनविश्वात नवनवीन प्रयोग करण्यासाठी ओळखले जाणारे निर्माते आणि क्रिएटर JD मजीठिया आता प्रेक्षकांसाठी आणखी एक वेगळा प्रयोग घेऊन येत आहेत. ‘चुंबक’ या प्रोजेक्टला मिळालेल्या शानदार यशानंतर ते ‘तुलसी है ना’ या नव्या सीरिजच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित कथाकथनाचा अनोखा अनुभव देण्यास सज्ज झाले आहेत. प्रत्यक्ष कलाकारांचे चेहरे आणि आवाज यांचा AI तंत्रज्ञानासोबत मेळ घालून ही सीरिज साकारण्यात आली आहे. अभिनेत्री शुभांगी अत्रे या प्रोजेक्टमध्ये मध्यवर्ती भूमिका निभावणार असून त्या ‘तुलसी’ या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

‘तुलसी है ना’ या सीरिजच्या संकल्पनेविषयी बोलताना JD मजीठिया यांनी मनोरंजन क्षेत्रात बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. एक क्रिएटर म्हणून काळानुसार बदलणे आणि नवनवीन प्रयोग करणे आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे. ‘चुंबक’नंतर कथाकथनाच्या पारंपरिक पद्धतीला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगळे स्वरूप कसे देता येईल, याचा विचार करण्यात आला. त्यातूनच ‘तुलसी है ना’ या हायब्रिड फॉरमॅटमधील सीरिजची निर्मिती करण्याची कल्पना पुढे आली. या प्रयोगात कथेतील भावनिक आशय आणि खोली कायम ठेवतानाच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कथाविश्व अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शुभांगी अत्रे यांची प्रमुख भूमिका या प्रोजेक्टचे महत्त्व आणखी वाढवणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या नव्या प्रयोगाचा भाग झाल्याबद्दल शुभांगी अत्रे यांनीही आनंद व्यक्त केला. JD मजीठिया यांच्यासोबत यापूर्वी काम केले असल्याने त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र येणे आपल्यासाठी विशेष असल्याचे त्यांनी सांगितले. अभिनेत्री म्हणून नेहमीच वेगवेगळ्या भूमिका आणि नवीन संकल्पनांवर काम करण्याची इच्छा असते. ‘तुलसी है ना’मुळे पारंपरिक कथाकथनाच्या चौकटीपलीकडे जाणाऱ्या एका अभिनव प्रयोगात सहभागी होण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्यक्ष अभिनय, कलाकारांचे आवाज आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या तिन्ही घटकांचा एकत्रित वापर मनोरंजनाच्या क्षेत्रात नव्या शक्यता निर्माण करणारा ठरू शकतो, असे शुभांगी यांनी म्हटले. ‘तुलसी’ ही व्यक्तिरेखा साकारताना त्यांना एक वेगळाच अनुभव मिळाला. कथेतील भावनिक पैलूंना महत्त्व देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या या प्रोजेक्टचा भाग होता आल्याने त्या उत्सुक आहेत.
७ नोव्हेंबर रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना नेहमीच्या मनोरंजनापेक्षा काहीतरी वेगळे देण्याचा Hats Off Productionsचा हा प्रयत्न आहे. कलाकारांचा प्रत्यक्ष अभिनय आणि AI तंत्रज्ञान यांची सांगड घालणारी ‘तुलसी है ना’ ही सीरिज कथाकथनाच्या नव्या स्वरूपाची ओळख करून देणार आहे. त्यामुळे या प्रयोगाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि मनोरंजनाच्या बदलत्या विश्वात ही सीरिज किती प्रभाव पाडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.