फटाके न फोडण्याच्या आवाहनावरून ट्रोलिंग

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
मुंबई
soni razdan दिवाळीत फटाके फोडण्याऐवजी पर्यावरण आणि आरोग्याचा विचार करण्याचे आवाहन केल्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री सोनी राजदान यांना सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला. या ट्रोलिंगला आता त्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. फटाके न फोडण्याबाबत केलेली टिप्पणी कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून वाढते वायू प्रदूषण, सार्वजनिक आरोग्य आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून त्याला धार्मिक रंग दिला जात असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.




आलिया भट्टची आई असलेल्या सोनी राजदान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकांना फटाक्यांमुळे मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन केले होते. फटाके फोडणे हे आरोग्यविरोधी आणि राष्ट्रविरोधी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. मात्र, त्यांच्या या विधानातील ‘राष्ट्रविरोधी’ या शब्दावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. फटाके फोडण्याच्या कृतीसाठी अशा कठोर शब्दांचा वापर करणे योग्य नसल्याचे म्हणत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली.

या टीकेला उत्तर देताना सोनी राजदान यांनी आपल्या विधानामागील भूमिका स्पष्ट केली. ‘राष्ट्रविरोधी’ या शब्दाच्या वापरामुळे गैरसमज निर्माण झाला असल्याचे त्यांनी मान्य केले. केवळ फटाके फोडल्याने कोणी देशभक्त ठरत नाही आणि फटाके न फोडण्याचा निर्णय घेतल्याने कोणी राष्ट्रविरोधी ठरत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, केवळ वैयक्तिक आनंदासाठी जाणूनबुजून धोकादायक वायू प्रदूषणात भर घालणे आणि त्यामुळे इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण करणे ही खरी बेजबाबदार कृती असल्याचे त्यांनी म्हटले. ‘राष्ट्रविरोधी’ हा शब्द वापरायचाच असेल, तर स्वतःच्या काही क्षणांच्या आनंदासाठी संपूर्ण समाजाच्या आरोग्याला संकटात टाकणाऱ्या कृतीला तो अधिक लागू होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी त्यांनी सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांच्या कल्याणाशी संबंधित विषयांना धार्मिक वादाचे स्वरूप देण्याची गरज काय, असा सवालही उपस्थित केला. फटाक्यांचा मुद्दा हा कोणत्याही धर्माशी संबंधित नसून प्रत्येकाला स्वच्छ हवा मिळण्याच्या अधिकाराशी निगडित आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. वाढत्या प्रदूषणामुळे लहान मुलांना आजारांचा सामना करावा लागतो, त्यांच्या शाळा बुडतात आणि श्वसनाशी संबंधित समस्याही उद्भवतात. त्यामुळे या प्रश्नाकडे केवळ सण किंवा धार्मिक परंपरेच्या दृष्टिकोनातून न पाहता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

देशातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याचा हा प्रश्न असून त्यामध्ये धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव करता येणार नाही, असेही सोनी राजदान यांनी स्पष्ट केले. अखेरीस हात जोडून त्यांनी आपल्या संदेशाचा विपर्यास न करण्याची विनंती केली. मुले ही संपूर्ण समाजाची जबाबदारी असून प्रत्येक मुलाला स्वच्छ हवेत श्वास घेण्याचा अधिकार आहे, असे सांगत त्यांनी फटाक्यांबाबत सामूहिक जबाबदारीची जाणीव करून दिली.