मस्कत,
US attacks Iran again अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांनंतर मध्यपूर्वेत संघर्ष चिघळण्याची शक्यता वाढली असताना अमेरिकेच्या सैन्याने शनिवारी पुन्हा इराणी लष्करी तळ आणि बंदरांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यात इराणची हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे नष्ट झाली. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) ताकदीने प्रत्त्युत्तराचा इशारा दिल्याने आखाती प्रदेशात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धात तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अमेरिकन सैन्याने इराणवर नवीन मर्यादित लष्करी हल्ले केले आहेत. हे हल्ले इराणच्या हवाई संरक्षण प्रणालीला लक्ष्य करून करण्यात आले. इराणने अलीकडेच एक नवीन विमानविरोधी प्रणाली विकसित केली होती, जी अमेरिकन सैन्याने काही मिनिटांतच नष्ट केली. याशिवाय त्यांची लष्करी आणि नौदलाच्या तळावर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. बंदरांवरही करण्यात आलेल्या हल्ल्यात त्यांच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये असलेल्या केशम बेटाच्या शुजा भागात बॉम्बवर्षाव करण्यात आला. अमेरिकेशी करार करण्यास उशीर झाल्यास इराणची उर्वरित क्षमता नष्ट केली जाईल. त्यांनी आखाती देशांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला.
कतारचा इराणसमोर नवा प्रस्ताव
एकीकडे अमेरिका लष्करी कारवाई करत असताना, दुसरीकडे युद्ध संपवण्यासाठीचे राजनैतिक प्रयत्नही तीव्र झाले आहेत. कतारच्या अधिकाऱ्यांच्या मते, इराण आपल्या अणुकार्यक्रमावरून अमेरिकेशी असलेले मतभेद मिटवण्यासाठी सादर केलेल्या नव्या प्रस्तावांचा आढावा घेत आहे. या प्रकरणात कतार एक प्रमुख मध्यस्थ म्हणून काम करत आहे. तथापि, इराण सध्या आपल्या अणुकार्यक्रमावर ट्रम्प प्रशासनासोबत वाटाघाटी सुरू करण्यास तयार नाही. त्यांनी यासाठी काही अटी ठेवल्या आहेत, ज्या कोणत्याही युद्धविराम कराराचा भाग असाव्यात अशी त्यांची इच्छा आहे.
अणुकार्यक्रमाची माहिती देणाऱ्यांना १८० कोटींचे बक्षीस
इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित कोणतीही माहिती देणाऱ्या व्यक्तींना अमेरिका आता अब्जाधीश बनवणार आहे. अमेरिकेच्या लष्कराने इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित माहिती देणाऱ्याला २० दशलक्ष डॉलर्स (१८० कोटी रुपयांचे) बक्षीस देण्याची घोषणा केली. माहिती देणाऱ्याला पसंतीच्या शहरात स्थलांतरित होण्याचा पर्यायही उपलब्ध असेल.
सशस्त्र दलाच्या सर्व शाखांना सतर्कतेचे आदेश
इराणने आपल्या सर्व सशस्त्र दलांना सतर्क राहण्याचा आदेश जारी केला, त्यांनी यासाठी लष्करासाठी कोड १०० जारी केला आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर्प्स, सामान्य लष्कर, हवाई दल आणि अंतर्गत सुरक्षा पाहणाऱ्या सर्वांना संभाव्य लष्करी कारवाईसाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. तसेच विमानांसाठी हवाई हद्द बंद करण्यात आली. कोड १०० ही सर्वोच्च लष्करी आपत्कालीन स्थिती अन् सज्जता असते.