ऑस्ट्रेलिया,
usman-khawaja ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हादरवून सोडणाऱ्या २०१८ मधील सँडपेपर प्रकरणाबाबत माजी क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाने महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. चेंडूशी छेडछाड करण्याच्या या प्रकरणाची माहिती केवळ काही मोजक्या खेळाडूंनाच नव्हती, तर संपूर्ण संघाला याची कल्पना होती, असा दावा ख्वाजाने केला आहे. त्याच्या आगामी आत्मचरित्रातून हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २०१८ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान केपटाऊन कसोटीत चेंडूशी छेडछाड केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र, संघातील इतर खेळाडूंनी या प्रकाराची आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले होते. २०२१ मध्ये पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि नॅथन लायन यांनीही यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली होती.
दरम्यान, उस्मान ख्वाजाने आपल्या 'सबर' या आत्मचरित्रात या घटनेबाबत वेगळाच दावा केला आहे. १० नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर 'नाइन' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने अनेक प्रश्न उपस्थित केले. त्याच्या म्हणण्यानुसार, चेंडूशी छेडछाड करण्याचा प्रकार केवळ केपटाऊन कसोटीपुरता मर्यादित नव्हता. पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या त्याआधीच्या कसोटी सामन्यातच या प्रकाराची सुरुवात झाली होती. केपटाऊन कसोटीच्या वेळी कॅमेरून बँक्रॉफ्ट ड्रेसिंग रूममध्ये आपल्या शेजारी बसला होता. असे असतानाही क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या तपास अधिकाऱ्यांनी आपली चौकशी का केली नाही, असा सवाल ख्वाजाने उपस्थित केला. या चुकीमध्ये केवळ फलंदाज, गोलंदाज किंवा प्रशिक्षकांचा सहभाग नव्हता, तर ड्रेसिंग रूममधील संपूर्ण संघाला याची माहिती होती, असे त्याने स्पष्ट केले.
इतक्या वर्षांनंतर हा विषय पुन्हा समोर आणण्यामागचे कारण सांगताना ख्वाजा म्हणाला की, हे प्रकरण उघड करण्याची आपली इच्छा नव्हती. आठ वर्षांनंतर सत्य स्वतःहून समोर येईल, अशी त्याला अपेक्षा होती. मात्र, इतका काळ उलटूनही तसे झाले नसल्याने त्याने आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणाची जबाबदारी केवळ तीन खेळाडूंवर टाकणे योग्य नव्हते, असेही ख्वाजाचे मत आहे. संपूर्ण संघाने या घटनेची जबाबदारी स्वीकारायला हवी होती. घटनेनंतर त्याने ड्रेसिंग रूममध्ये सहकाऱ्यांशी चर्चा करून सर्वांनी जबाबदारी वाटून घेण्याची भूमिका मांडली होती. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणामुळे स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. संपूर्ण प्रकरणाचा भार या तिघांनाच सहन करावा लागला, असेही ख्वाजाने म्हटले आहे.