रेल्वे मंत्रालयात ‘वॉर रूम’ स्थापन!

अश्विनी वैष्णव यांची माहिती; वाढती गर्दी करणार नियंत्रित

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
War Room set up in the Ministry of Railways दिवाळी आणि छट पूजेची देशभरातील रेल्वेस्थानकांवर होत असलेली वाढती गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयात स्थापन करण्यात आलेल्या आणि २४ तास चालणार्या अत्याधूनिक अशा वॉर रुमची रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी पाहणी करत समाधान व्यक्त केले. महाराष्ट्रातील नागपूर, पुणे आणि मुंबईसह देशभरातील २८ रेल्वेस्थानकांवरील गर्दीचे या वॉर रुममधून नियंत्रण केले जाणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी गतवर्षी रेल्वेने १२ हजार विशेष रेल्वे गाड्या सोडल्या होत्या, यावर्षी १८ हजार विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
 
 
War Room set up in the Ministry of Railways
 
 
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरुन दररोज सामान्यपणे ५ लाख प्रवासी प्रवास करतात, दिवाळी आणि छट पूजेच्या दरम्यान ही संख्या ८ लाखावर गेली आहे, याकडे लक्ष वेधत वैष्णव म्हणाले की, रेल्वे स्थानकावर गर्दीचे नियंत्रण करण्यासठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने या वॉररुममधून नवी दिल्ली, हजरत निझामुद्दिन आणि आनंदविहारसह देशभरातील २८ रेल्वेस्थानकांवरील गर्दीचे समन्वय आणि नियंत्रण केले जात आहे, याकडे लक्ष वेधत वैष्णव म्हणाले की, नवीन दिल्ली आणि आनंदविहार स्थानकावर प्रवाशांना प्लॅटफॉर्मच्या बाहेर रोखण्यासाठी विशेष प्रतिक्षालय (होल्डिंग एरिया ) तयार करण्यात आला आहे. याठिकाणी प्रवाशांसाठी बसण्याची, पिण्याच्या पाण्याची आणि अन्य सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे.प्रवाशांसाठी आत जाण्याचे आणि बाहेर येण्याचे स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आले आहे. हिटमॅप पध्द्तीने गर्दीचे नियंत्रण केले जात आहे, रेल्वेस्थानकावर एका मार्गासाठी गर्दी वाढल्याचे लक्षात येताच तात्काळ विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला जातो.
दोन कोटी नागरिकांचा प्रवास
नवी दिल्ली, पुरानी दिल्ली, आनंद विहार, हजरत निजामुद्दिन आणि सरायरोहिला या दिल्लीतील रेल्वेस्थानकावतरुन १ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान दोन कोटी प्रवाशांनी प्रवास केला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, लोकमान्य टिळक टर्मितल तसेच बांद्रा रेल्वेस्थानकावरुन याच काळात दीड कोटी प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती वैष्णव यांनी दिली.