झी मराठीच्या कलाकारांची दिवाळी यंदा खास!

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
मुंबई
diwali memories
झी मराठीच्या कलाकारांची दिवाळी यंदा खास! कोणाच्या घरी सजणार आकाशकंदील, तर कोणाला आठवतेय लहानपणीची करंजी? दिवाळी म्हटली की घराची साफसफाई, फराळाचा सुगंध, नवीन कपड्यांची खरेदी, आकर्षक आकाशकंदील, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळलेले घर, असे आनंदाचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. या सणाचे महत्त्व केवळ परंपरा जपण्यापुरते मर्यादित नसून कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणणाऱ्या आठवणींमध्येही दडलेले आहे. बालपणी आईला साफसफाईत केलेली मदत, मित्रांसोबत उत्साहाने उभारलेला किल्ला, घरात बनणारा फराळ आणि फटाक्यांची आतुरता या आठवणी मोठे झाल्यानंतरही मनात ताज्या राहतात. काळानुसार कामाच्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या स्वरूपात बदल झाला असला, तरी दिवाळीचा आनंद मात्र कायम आहे. झी मराठीवरील विविध मालिकांमधील कलाकारांनी आपल्या बालपणीच्या दिवाळीच्या आठवणी, सध्याच्या सणाच्या तयारीविषयी आणि यंदाच्या दिवाळीच्या खास योजनांविषयी मनमोकळेपणाने सांगितले.



‘सनई चौघडे’ मालिकेत जयची भूमिका साकारणारा राज हंचनाळे याच्यासाठी यंदाची दिवाळी दुहेरी आनंद घेऊन आली आहे. आयुष्यातील दोन महत्त्वाच्या गोष्टींमुळे यंदाचा सण विशेष असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या आयुष्यात आलेली छोटी मुलगी आणि मालिकेला मिळणारे प्रेक्षकांचे प्रेम, या दोन्ही गोष्टींना त्याने लक्ष्मीचे रूप मानले आहे. मालिकेला ‘बेस्ट शो’चा पुरस्कार मिळणे, कामाचे कौतुक होणे आणि समाजमाध्यमांवर प्रेक्षकांकडून सातत्याने शुभेच्छा व प्रेमळ संदेश मिळणे, यामुळे तो भारावून गेला आहे. प्रेक्षक हेच आपले खरे गॉडफादर असून त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच आपली ताकद असल्याची भावना त्याने व्यक्त केली. यंदा कुटुंबीयांसह आपल्या छोट्या लेकीसोबत पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचा त्याचा मानस आहे. मिळणारे प्रेम ही केवळ सुरुवात असून भविष्यात प्रेक्षकांसाठी आणखी उत्तम काम करण्याची इच्छा असल्याचे सांगत त्याने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

‘कमळी’ मालिकेत कमळीची भूमिका करणाऱ्या विजया बाबर हिच्या दिवाळीच्या आठवणी घरातील साफसफाई आणि आईसोबतच्या फराळाच्या तयारीशी जोडलेल्या आहेत. सध्या मालिकेच्या चित्रीकरणामुळे सणाच्या तयारीसाठी आईला फारशी मदत करता येत नसल्याची खंत तिने व्यक्त केली. मात्र, लहानपणी घरातील सर्वांत धाकटी असल्याने शाळा किंवा महाविद्यालयातून घरी आल्यानंतर ती आईसोबतच असायची. ताई, दादा आणि वडील आपापल्या कामानिमित्त बाहेर असताना घराची साफसफाई करण्याची जबाबदारी दोघी मिळून पार पाडत असत. फराळ बनवण्याची तिला विशेष आवड आहे. दिवाळीच्या काळात साधे, रंग न केलेले दिवे आणण्यास ती आईला सांगायची आणि घरी स्वतःच्या हाताने त्यांना वेगवेगळे रंग द्यायची. आपण रंगवलेले दिवे दिवाळीत घरात लावले जातात, याचा तिला लहानपणी विशेष आनंद वाटायचा.

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत शंकरची भूमिका साकारणाऱ्या रोहित परशुराम यानेही बालपणीच्या दिवाळीतील अनेक आठवणी उलगडल्या. अभिनेता झाल्यानंतर कामानिमित्त मुंबईत राहावे लागत असल्याने पूर्वीसारखा दिवाळीच्या तयारीत सहभागी होता येत नसल्याचे त्याने सांगितले. सध्या आई आणि भाऊ घराची सजावट, रोषणाई, आकाशकंदील, पणत्या आणि रांगोळीची तयारी आधीच करून ठेवतात. फराळाचे पदार्थही तयार असतात. त्याची पत्नी पूजाही नोकरी करत असल्याने आणि मुलगी रुई लहान असल्याने त्यांच्या घरातील दिवाळीची लगबग तुलनेने मर्यादित असते. तरीही वेळ मिळेल तशी साफसफाई करून छोटासा आकाशकंदील लावण्याचा प्रयत्न ते करतात.

मात्र, भोरमधील बालपणीची दिवाळी त्याच्यासाठी आजही तितकीच खास आहे. घरातील पंखे पुसण्याचे काम त्याच्याकडे असायचे. लहान असल्यामुळे खुर्चीवर स्टूल ठेवून दादा आणि नाना त्याला आधार द्यायचे आणि तो उत्साहाने पंखे स्वच्छ करायचा. फराळ बनवताना आईला मदत करण्यातही तो आघाडीवर असायचा. तीन भावांमध्ये सर्वांत लहान असल्याने स्वयंपाकघरात आईसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी त्याला मिळायची. फराळ बनवण्याबरोबरच तो खाण्याचाही आनंद घ्यायचा. विशेषतः गरमागरम करंजी खाण्याचा आनंद कशातही मिळू शकत नसल्याचे त्याने सांगितले. वडिलांसोबत भोरच्या बाजारात दिवाळीची खरेदी करण्यासाठी जाणे आणि घरासाठी स्वतःच्या पसंतीचा आकाशकंदील निवडणे, हा त्याच्या आवडीचा भाग होता. घरातील धाकटा असल्याने नाना आणि दादा त्याच्या पसंतीला प्राधान्य द्यायचे. शाळेत होणाऱ्या आकाशकंदील बनवण्याच्या स्पर्धा, भोरमधील थंडी आणि दिवाळीच्या दिवसांत पडणारे धुके या आठवणी आजही त्याच्या मनात घर करून आहेत.

‘तारिणी’ मालिकेत तारिणीची भूमिका करणारी शिवानी सोनार हिच्यासाठी दिवाळी हा नेहमीच आवडता सण राहिला आहे. या काळात मिळणाऱ्या सलग दोन ते तीन दिवसांच्या सुट्ट्यांबरोबरच मालिकेच्या चित्रीकरणामुळे सेटवरही दिवाळी साजरी करण्याची संधी मिळत असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे तिच्यासाठी दिवाळीचा उत्सव जवळपास दहा ते बारा दिवस सुरू असतो. मालिकेच्या सेटवरील सहकलाकार आणि घरातील कुटुंबीय अशा दोन्ही ठिकाणी फराळ, सजावट आणि सणाची धामधूम अनुभवता येते. यंदा घराच्या सजावटीची जबाबदारी तिने स्वतःकडे घेतली आहे. चित्रीकरणाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ती बहुतांश वस्तूंची ऑनलाइन खरेदी करत आहे. मात्र, तिला विशेष आवडणारा षटकोनी आकाराचा, एकाच रंगातील पारंपरिक आकाशकंदील अद्याप शोधायचा आहे. तो मिळाल्यानंतर त्याच्यासोबतचा फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट करण्याची तिची योजना आहे.

कामानिमित्त शिवानी आणि तिचे कुटुंब मुंबईत राहत असले, तरी तिचे माहेर आणि सासर पुण्यात आहे, तर तिचा भाऊ बेंगळुरूला असतो. दिवाळीच्या निमित्ताने मात्र संपूर्ण कुटुंब एकत्र येते. भाऊबीज आणि पाडवा यांसारख्या सणांमधून मिळणारी सकारात्मक ऊर्जा तिला विशेष भावते. बालपणी ती आणि तिचा भाऊ मिळून दिवाळीचा किल्ला तयार करायचे. सध्या चित्रीकरणामुळे त्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसला, तरी यंदा संधी मिळाल्यास पुन्हा किल्ला बनवण्याची तिची इच्छा आहे. माती गोळा करणे, वेगवेगळ्या आकारांचे दगड आणणे, पोती आणि धान्याची व्यवस्था करणे, मावळे विकत घेणे किंवा जुन्या मावळ्यांना रंग देणे, या संपूर्ण प्रक्रियेत तिला विशेष आनंद मिळतो. त्यामुळे फराळापेक्षाही दिवाळीचा किल्ला तयार करण्याची ओढ अधिक असल्याचे तिने सांगितले.

‘धाकट्या सुनबाई’ मालिकेत वेदांतची भूमिका करणारा मंदार जाधव याच्यासाठी दिवाळीची तयारी म्हणजे घराच्या साफसफाईत हातभार लावणे, थोडीफार खरेदी करणे आणि आवडीने फराळाचा आस्वाद घेणे. बालपणी नवीन कपडे, फटाके आणि आईच्या हातच्या पदार्थांची त्याला विशेष उत्सुकता असायची. दिवाळीच्या आधी घरात होणारी खरेदी, सजावट, आकाशकंदील तयार करणे, रोषणाई आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्याची लगबग त्याला आजही आठवते. आता जबाबदाऱ्या वाढल्याने सणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असला, तरी दिवाळीचा उत्साह आणि आनंद तसाच असल्याचे त्याने नमूद केले. त्याच्यासाठी दिवाळी म्हणजे केवळ धार्मिक किंवा पारंपरिक सण नसून कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची, आवडीचे पदार्थ खाण्याची आणि एकत्र आनंद साजरा करण्याची संधी आहे.

‘सनई चौघडे’ मालिकेतील असावरीची भूमिका साकारणारी जुई पुष्पा प्रफुल्ल गोगरी हिच्या दिवाळीच्या आठवणी कुटुंबातील बहिणींच्या धमाल-मस्तीने भरलेल्या आहेत. आई आणि सर्व बहिणी एकत्र येऊन घराची साफसफाई करतात. या कामादरम्यान मोठी बहीण कधी केवळ सूचना देत बसते आणि स्वतः मात्र आराम करते, अशी गमतीशीर आठवणही तिने सांगितली. दिवाळीच्या खरेदीत रांगोळी, दिवे, रोषणाईसाठीच्या माळा, तोरण आणि गॅलरी सजवण्यासाठी वेगवेगळ्या डिझाइनचे सिरॅमिकचे दिवे घेण्यावर त्यांचा भर असतो. दरवर्षी सजावटीसाठी काहीतरी नवीन असावे, असा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे खरेदीच्या वेळी तिची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची असते. तिच्याशिवाय खरेदी झाली तर तिला राग येतो, असेही तिने मिश्कीलपणे सांगितले.

पूर्वी दिवाळीच्या खरेदीचा संपूर्ण खर्च आई-वडील करत असत आणि बहिणी केवळ आवडीच्या वस्तू निवडत असत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून घराच्या दिवाळीच्या सजावटीसाठी काय घ्यायचे आणि काय टाळायचे, याची जबाबदारी जुई स्वतः सांभाळत आहे. स्वतः कमावलेल्या पैशांतून घराची जबाबदारी पार पाडता येत असल्याचा आनंद तिने व्यक्त केला. त्यांच्या घरी फराळाचे पदार्थ बाहेरून आणण्याची पद्धत नाही. संपूर्ण कुटुंब एकत्र बसून दररोज एकेक पदार्थ तयार करते. लहानपणी ती कधी कधी शेजाऱ्यांकडे जाऊन फराळ बनवण्यात मदत करायची आणि तिथेच रमून जायची. रांगोळी काढणे हा मात्र तिच्या दिवाळीतील कधीही न चुकणारा भाग होता. बहीण निकितासोबत ती दरवर्षी रांगोळी काढायची. आता निकिताचे लग्न होऊन ती हैदराबादला राहत असल्याने रांगोळी काढताना तिची आठवण येते. दोघी रांगोळी पूर्ण केल्यानंतर आई-वडील आणि इतर बहिणींना ती छान झाली आहे ना, असे वारंवार विचारायच्या. कुटुंबीयांसोबत एकत्र येणे, गप्पा-मस्ती करणे, साड्या नेसून फोटो काढणे आणि दिवाळीची पूजा करणे, या सगळ्या गोष्टींमुळे हा सण तिच्यासाठी खास ठरतो.

‘कमळी’ मालिकेत ऋषीची भूमिका साकारणारा निखिल दामले याच्यासाठी दिवाळी म्हणजे आई आणि आजीच्या हातच्या फराळाची प्रतीक्षा. वर्षभरात सर्वाधिक आवडणाऱ्या आणि आतुरतेने वाट पाहिल्या जाणाऱ्या सणांमध्ये दिवाळीचा समावेश असल्याचे त्याने सांगितले. दरवर्षी संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन पार्टी करते, फराळाचा आनंद घेते आणि विविध खेळ खेळते. यंदा चित्रीकरणाच्या व्यस्ततेमुळे साफसफाई आणि सणाच्या तयारीत फारसे सहभागी होता येणार नसले, तरी बालपणीची एक आठवण त्याच्या मनात विशेष जपली गेली आहे. मित्रांसोबत महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करणे आणि किल्ला बनवण्याच्या स्पर्धांमध्ये सहभागी होणे, हा त्याच्या दिवाळीतील सर्वांत आवडता भाग होता.

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत गौरीची भूमिका करणारी ट्विंकल यादव हिच्यासाठीही दिवाळी हा कुटुंबाला एकत्र आणणारा महत्त्वाचा सण आहे. लहानपणी ती दिवाळी साजरी करण्यासाठी गावी जायची. तिथे घरातील सर्व मंडळी एकत्र बसून फराळाचे पदार्थ तयार करत असत. तीही या प्रक्रियेकडे आवडीने पाहायची आणि जमेल तशी मदत करायची. मात्र, त्या काळात तिचे मुख्य आकर्षण फराळापेक्षा फटाके फोडणे हेच असायचे. आता तिच्या जबाबदाऱ्या वाढल्या असून घरासाठी काय खरेदी करायचे, कोणत्या वस्तूंची गरज आहे, याबाबत ती आईसोबत चर्चा करते. खरेदीत सक्रिय सहभाग घेण्याबरोबरच फराळ बनवण्यातही ती आवडीने मदत करू लागली आहे.

एकूणच, झी मराठीच्या कलाकारांसाठी दिवाळीचा अर्थ प्रत्येकाचा वेगळा असला, तरी कुटुंबीयांसोबतचे क्षण, बालपणीच्या आठवणी, घरगुती फराळ आणि सणानिमित्त मिळणारा एकत्रित आनंद या गोष्टी सर्वांच्या अनुभवांमध्ये समान आहेत. चित्रीकरण आणि व्यस्त दिनक्रमामुळे सणाच्या तयारीसाठी वेळ कमी मिळत असला, तरी आपल्या माणसांसोबत दिवाळी साजरी करण्याची ओढ आजही कायम आहे. बालपणीच्या आठवणींना उजाळा देत नव्या जबाबदाऱ्यांसह दिवाळीचा आनंद घेण्यासाठी हे कलाकारही सज्ज झाले आहेत.