दिवाळीत भेसळखोरांवर संक्रांत, FSSAI ची धडक कारवाई

देशभरातून 81.8 कोटींचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त

    दिनांक :09-Nov-2026
Total Views |
1,100 हून अधिक परवाने निलंबित
नवी दिल्ली,
Adulterated food stock worth ₹81.8 crore seized सणासुदीच्या काळात खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) राज्य अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सहकार्याने देशभरात एक व्यापक आणि धडक मोहीम राबवली आहे. वृत्तानुसार, गेल्या दोन महिन्यांत राबवलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान देशभरातून तब्बल 81.8 कोटी रुपयांचा म्हणजेच सुमारे 3,270 मेट्रिक टन भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1,100 हून अधिक व्यवसायिकांचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत.
 
 
Adulterated food stock
 
 
10 हजारांहून अधिक जणांना सुधारणा नोटिसा बजावल्या
FSSAI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सामायिक केलेल्या अधिकृत माहितीनुसार, 1 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल 56,431 अन्न व्यवहार करणाऱ्या आस्थापनांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या व्यापक तपासणी मोहिमेदरम्यान कायदेशीर अटींचे उल्लंघन करणाऱ्या 10,047 प्रतिष्ठानांना त्रुटी दूर करण्यासाठी सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
 
 
दूध, पनीर, तूप आणि मिठाईमध्ये सर्वाधिक भेसळ
या मोहिमेदरम्यान प्राधिकरणाने एकूण 43,939 अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी गोळा केले होते, त्यापैकी 24,648 नमुना तपासण्या पूर्ण झाल्या असून तब्बल 2,273 नमुने सुरक्षा मानकांवर पूर्णपणे अयोग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रामुख्याने खाद्यतेल, दूध, पनीर, तूप, मिठाई, बेकरी उत्पादने, चॉकलेट्स, आईस्क्रीम, नमकीन आणि फेस्टिव्हल गिफ्ट हॅम्पर्स यांसारख्या सण-उत्सवात मोठ्या प्रमाणावर खपणाऱ्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ असल्याचे समोर आले आहे.
 
 
भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांवर कसूर न ठेवता प्रशासनाने निकृष्ट अन्नपदार्थ विकणाऱ्या 52 आस्थापनांचे परवाने कायमचे रद्द केले आहेत. तसेच 314 दुकाने व कारखाने तत्काळ प्रभावाने सील करण्यात आले असून, दोषी आढळलेल्या 410 जणांविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड कधीही खपवून घेतली जाणार नाही आणि आगामी काळातही अशीच कठोर तपासणी मोहीम सातत्याने सुरू राहील, असा स्पष्ट इशारा प्राधिकरणाने दिला आहे.
52 आस्थापनांचे परवाने कायमचे रद्द, 314 दुकाने सील