४ लाख पाहुणे, बक्षीस म्हणून थार देशातील या शाही लग्नाची सर्वत्र चर्चा

    दिनांक :09-Nov-2026
Total Views |
बिहार
Anant Singh Daughter
बिहारमधील जेडीयूचे आमदार अनंत सिंह यांच्या कन्या शिवांगी यांच्या विवाहसोहळ्याची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्या मुलीचे लग्न अविस्मरणीय व्हावे, यासाठी अनंत सिंह यांनी जय्यत तयारी केली आहे. या शाही विवाहसोहळ्यासाठी देशभरातील राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या लग्नाला तब्बल चार लाख पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने हा सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे.



अनंत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना लग्नाचे निमंत्रण देण्यात आले आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद, लोकगायिका मैथिली ठाकूर, खासदार आणि गायक मनोज तिवारी यांच्यासह भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार पवन सिंह आणि अक्षरा सिंह हे या विवाहसोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण देण्याची तयारी असल्याचे सांगण्यात येत आहे.


घोडेस्वारी स्पर्धेतील विजेत्याला थार कारचे बक्षीस

या विवाहसोहळ्यात केवळ पाहुणचारच नव्हे, तर विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यातील घोडेस्वारी स्पर्धा विशेष चर्चेत आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्याला चक्क थार कार बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला मोटारसायकल मिळणार आहे.


चार लाख पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था


या विवाहसोहळ्याला सुमारे चार लाख पाहुणे उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवणाची भव्य व्यवस्था करण्यात येत आहे. लग्नाच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले असून, अनंत सिंह यांच्या परिचयातील सर्वांना निमंत्रण देण्यावर भर दिला जात आहे. पाहुण्यांची संख्या आणि सोहळ्याचे भव्य स्वरूप लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्थाही तैनात केली जाणार आहे.

विशेष म्हणजे, या विवाहसोहळ्यात फटाके फोडले जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. पर्यावरणाची काळजी घेण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. दुसरीकडे, लग्नासाठी नेमका किती खर्च करण्यात येणार आहे, याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. मात्र, सोहळ्याच्या भव्य तयारीवरून मोठा खर्च होणार असल्याची चर्चा आहे.

बिहारमधील सर्वात मोठ्या विवाहसोहळ्यांपैकी एक म्हणून या लग्नाकडे पाहिले जात आहे. इतक्या मोठ्या संख्येने पाहुणे आणि देशभरातील राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या शाही विवाहसोहळ्याच्या माध्यमातून अनंत सिंह आपली राजकीय ताकद आणि जनसंपर्कही दाखवून देत असल्याची चर्चा रंगली आहे.