मुजफ्फरनगर,
Car engulfed in massive fire; six people dead उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. पानिपत-खटीमा राज्य महामार्गावरील तितावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. हरियाणातील पानिपत येथून शामलीमार्गे मुजफ्फरनगरच्या दिशेने जाणारी हुंडई ऑरा कार जग्गाहेड़ी टोलनाक्यापुढील फ्लायओव्हरवरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास भरधाव कार दुभाजकाला धडकली. धडकेनंतर कार विरुद्ध दिशेला जाऊन उलटली आणि काही क्षणांतच तिने पेट घेतला. कारमधील सहाही प्रवासी आगीच्या विळख्यात सापडले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून कारला लागलेली आग आटोक्यात आणली. त्यानंतर कारमधील सहाही प्रवाशांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर भाजल्यामुळे उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला. आगीची तीव्रता इतकी होती की संपूर्ण कार जळून खाक झाली. त्यामुळे मृतांची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत. मृत व्यक्तींची ओळख निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुजफ्फरनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सूरज कुमार राय यांनी या घटनेची माहिती दिली. सोमवारी पहाटे सुमारे ५ वाजता पानिपतहून येणाऱ्या कारला अपघात झाल्याची माहिती मिळाली होती. कारमध्ये सहा प्रवासी होते. फ्लायओव्हरवर भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटून कार दुभाजकाला धडकली आणि विरुद्ध बाजूला उलटल्याने तिला आग लागली, असे त्यांनी सांगितले. माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. मात्र, सहाही प्रवाशांचा मृत्यू झाला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आवश्यक कायदेशीर कार्यवाही केली जात असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. घटनास्थळी कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न नसल्याचे पोलिसांनी सांगितले.