वॉशिंग्टन,
Chaos at Diwali event in Seattle अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच सिएटलमध्ये भारतीय समुदायाच्या दिवाळी उत्सवात वाद निर्माण झाला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक असलेले जॅक लँग आणि त्याचे काही सहकारी दिवाळीच्या कार्यक्रमात घुसले. यावेळी त्यांनी हातात पोस्टर घेऊन भारतीय समुदायाविरोधात घोषणाबाजी केली. 'सर्व भारतीयांना देशाबाहेर काढा' आणि 'हिंदू ख्रिश्चनांची जागा घेत आहेत', अशा आशयाचे संदेश असलेले फलक त्यांनी झळकावले. या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी तणाव निर्माण झाला. उपस्थितांनी जॅक लँग याला तातडीने कार्यक्रमातून बाहेर काढले. या घटनेचा अमेरिकेतील अनेक खासदारांनी निषेध केला असून भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेचा आणि धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

या घटनेतील जॅक लँग हा 'व्हाइट रिप्लेसमेंट' या संघटनेशी संबंधित असल्याचे वृत्तात म्हटले आहे. ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकेच्या संसद भवनावर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींमध्ये त्याचाही समावेश होता. या प्रकरणात त्याला चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. मात्र, २०२५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी त्याला माफी दिली होती. लँग याने भारतीय-अमेरिकन नागरिकांमुळे टेक्सासमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला राजकीय फायदा झाल्याचा दावाही केला. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दिवाळी साजरी केली असतानाच सिएटलमधील या घटनेने वेगळेच वळण घेतले आहे.
दरम्यान, भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. दिवाळी हा महत्त्वाचा सण असून हिंदू समुदायाला कोणत्याही भीतीशिवाय तो साजरा करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. द्वेष पसरवणाऱ्या अशा घटनांना अमेरिकेच्या शहरांमध्ये किंवा देशात कोणतेही स्थान नसल्याचेही त्यांनी म्हटले. खासदार राजा कृष्णमूर्ती यांनीही या घटनेचा निषेध केला. दिवाळीनिमित्त दिवा प्रज्वलित करण्याबरोबरच हिंदू आणि अन्य समुदायांविरोधात पसरवला जाणारा द्वेष संपवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. व्हाइट हाऊसचे माजी सल्लागार अजय जैन भुटोरिया यांनीही जॅक लँग आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या कृतीला अत्यंत निंदनीय ठरवले. भारतीय वंशाच्या नागरिकांना वंशभेद आणि कटकारस्थानांच्या आरोपांच्या माध्यमातून लक्ष्य करण्यास अमेरिकेत जागा नसल्याचे सांगत, प्रत्येक नागरिकाला आपली संस्कृती आणि परंपरा निर्भयपणे साजरी करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.