अनिल कांबळे
नागपूर,
Commissioner gives a unique gift to police personnel दिवाळी म्हटली की फराळ, मिठाई, पणत्या आणि भेटवस्तूंची रेलचेल. मात्र, नागपूर पोलिसांची यंदाची दिवाळी खाकी रंगात रंगली आहे. पोलिस दलाची ओळख असलेल्या खाकी वर्दीचे कापड हीच यंदाची दिवाळी भेट देत पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना अनोखी भेट दिली आहे. सुमारे १,५०० रुपये मूळ मूल्य असलेले साडेतीन मीटर खाकी कापड उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमाचा लाभ शहरातील तब्बल ८,५०० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे.

यापूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांना कर्मचारी कल्याण निधीतून सुमारे मिठाई, भुजिया, रांगोळी आणि मातीच्या पणत्या यांसारख्या दिवाळी भेटवस्तू दिल्या जात होत्या. यंदा मात्र पारंपरिक भेटवस्तूंपेक्षा दैनंदिन कर्तव्याशी थेट जोडलेली आणि दीर्घकाळ उपयोगी पडणारी भेट देण्याचा निर्णय पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतला. शहरातील संपूर्ण पोलिस दलाला एकाच दर्जाचे खाकी कापड उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गौतम सिंघानिया यांच्याशी थेट संपर्क साधला. त्यानंतर ८,५०० नग खाकी कापडाची खरेदी करण्यात आली. प्रत्येक नग साडेतीन मीटरचा असून, त्याचे मूळ मूल्य सुमारे १,५०० रुपये असतानाही अगदी काही रुपयांत उपलब्ध झाले. त्यामुळे बाजारमूल्याच्या तुलनेत प्रत्येक नगामागे सुमारे एक हजार रुपयांपेक्षा जास्त रुपयांची बचत झाली आहे.
खाकी वर्दीतून एकसमानतेचा संदेश
पोलिस दलात गणवेशाला केवळ पोशाखाचे नव्हे, तर शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि एकात्मतेचेही प्रतीक मानले जाते. एकाच दर्जाच्या कापडामुळे गणवेशातील एकसमानतेला चालना मिळण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्याही दिलासा मिळणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन गरजांचा विचार करून राबविण्यात आलेला हा उपक्रम कल्याणकारी दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरतो. यंदा नागपूर पोलिसांच्या दिवाळीत फराळासोबत खाकीचीही भेट मिळाली आहे. सणाच्या आनंदाला कर्तव्याची जोड देणारा हा उपक्रम पोलीस दलासाठी खास ठरला आहे.
चोवीस तास कर्तव्य बजावणे हीच खाकीची ओळख आहे. नागरिकांची सुरक्षा आणि सेवा बजावण्यासाठी खाकी नेहमी सज्ज असते. यावेळी दिवाळीत आम्ही खाकीतील पोलिस कर्मचाऱ्यांना ‘खाकी’ची अनोळखी भेट दिली आहे.
-विश्वास नांगरे पाटील (पोलिस आयुक्त)