दिवाळीत मराठमोळ्या सौंदर्याचा जलवा!

    दिनांक :09-Nov-2026
Total Views |
मुंबई
Diwali 2026
दिवाळी म्हटलं की घराघरांत सजणारी रोषणाई, आनंदाचे वातावरण, उत्साह आणि नटण्यासजण्याची लगबग आलीच! दिव्यांच्या सणात पारंपरिक पोशाखांना विशेष पसंती दिली जाते. विशेषतः साडी, नथ, गजरा आणि पारंपरिक दागिन्यांनी सजलेला मराठमोळा लूक सणाचा आनंद अधिकच वाढवतो. मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्रीही आपल्या फॅशन सेन्समधून पारंपरिक सौंदर्याची वेगवेगळी रूपं सादर करताना दिसत आहेत. कुणी शाही बनारसी अंदाजाला पसंती दिली आहे, तर कुणी आकर्षक रंगसंगती आणि पारंपरिक नक्षीकाम असलेल्या साड्यांमधून आपली स्टाइल दाखवली आहे. या दिवाळीत अभिनेत्रींच्या साडीतील लूकने विशेष लक्ष वेधून घेतले असून, त्यांच्या फॅशनमधून सणासुदीच्या पोशाखांसाठी नवनवीन प्रेरणा मिळत आहे.


अभिनेत्री सई ताम्हणकर हिने काळ्या आणि सोनेरी रंगाच्या साडीतून रॉयल लूक साकारला आहे. साडीवरील उठावदार सोनेरी नक्षीकाम आणि आकर्षक बॉर्डरमुळे तिच्या पोशाखाला शाही थाट प्राप्त झाला आहे. या साडीवर तिने डीप नेक डिझाइनचा पारंपरिक ब्लाऊज परिधान केला आहे. मोत्यांचा चोकर, लेयर्ड नेकलेस, आकर्षक कानातले आणि हातातील पारंपरिक दागिन्यांची निवड तिच्या लूकला अधिक देखणेपणा देते. यासोबतच सटल मेकअप, स्मोकी आयज आणि नीटनेटकी केशरचना यांची सांगड घालत सईने एलिगंट अंदाज जपला आहे. दिवाळीच्या पार्टीसाठी तिचा हा लूक विशेष लक्षवेधी ठरत आहे.

अभिनेत्री छाया कदम यांनी पिवळ्या रंगाच्या साडीतून प्रसन्न आणि देखणा पारंपरिक अंदाज सादर केला आहे. त्यांच्या साडीवर फुले आणि पक्ष्यांची रंगीबेरंगी कलात्मक नक्षी असून, सोनेरी किनार या साडीचे सौंदर्य अधिक खुलवते. हिरव्या रंगाचा ब्रोकेड ब्लाऊज या पोशाखाला उठावदार रंगसंगती देतो. पारंपरिक झुमके, हातातील ब्रेसलेट आणि कपाळावरील छोटीशी टिकली यांमुळे त्यांचा मराठमोळा साज अधिक खुलून दिसतो. कोणताही अवाजवी साज न करता साधेपणा आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी हा लूक प्रभावी केला आहे. चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य त्यांच्या सौंदर्यात आणखी भर घालते.

अभिनेत्री गिरीजा ओक यांनी सिल्व्हर आणि शॅम्पेन गोल्ड रंगछटांच्या साडीतून क्लासी लूक साकारला आहे. साडीवरील नाजूक एम्ब्रॉयडरी आणि वेगळ्या प्रकारचे टेक्स्चर यामुळे त्यांच्या पोशाखाला खास एलिगन्स मिळाली आहे. यावर त्यांनी जांभळ्या रंगाचा ब्लाऊज निवडला असून, त्यामुळे संपूर्ण लूकची रंगसंगती अधिक उठून दिसते. मोठे पारंपरिक इअररिंग्स, मोजके दागिने आणि सॉफ्ट मेकअप यांची निवड करत त्यांनी साधेपणातूनही आकर्षक दिसण्याची शैली जपली आहे.

अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिचा लाल रंगाच्या सिल्क साडीतील पारंपरिक अंदाज दिवाळीच्या वातावरणाला साजेसा आहे. साडीवरील सोनेरी चेक्स आणि पारंपरिक बॉर्डरमुळे तिचा पोशाख उठून दिसतो. त्यावर तिने गोल्डन मोटिफ्स असलेला लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. गळ्यातील टेंपल ज्वेलरी, आकर्षक कानातले, पारंपरिक नथ आणि केसांमधील गजरा यांमुळे तिचा मराठमोळा लूक अधिक खुलला आहे. दिव्यांच्या रोषणाईत टिपलेल्या तिच्या या लूकमध्ये पारंपरिक सौंदर्य आणि सणाचा उत्साह यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.

अभिनेत्री स्पृहा जोशी हिने गुलाबी आणि केशरी रंगछटांच्या साडीतून ग्रेसफुल अंदाज दाखवला आहे. साडीवरील पारंपरिक विणकाम आणि सुंदर बॉर्डरमुळे तिच्या पोशाखाला क्लासिक लूक मिळाला आहे. यासोबत तिने जांभळ्या रंगछटेचा ब्लाऊज परिधान केला असून, या वेगळ्या रंगसंगतीमुळे तिचा लूक अधिक आकर्षक झाला आहे. मोठे गोल्डन इअररिंग्स, हातातील बांगड्या आणि सटल मेकअप यांची निवड तिने केली आहे. नीटनेटकी केशरचना आणि चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य यामुळे स्पृहाचा साडीतील अंदाज साधा असूनही विशेष देखणा वाटतो.

अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिने लाल रंगाच्या पारंपरिक साडीतून अस्सल मराठमोळ्या सौंदर्याची झलक दाखवली आहे. साडीवरील छोटे सोनेरी मोटिफ्स आणि आकर्षक गोल्डन बॉर्डरमुळे तिचा पोशाख पारंपरिक पद्धतीने खुलून दिसतो. त्यावर तिने लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला असून, स्लीव्ह्जवरील नाजूक डिझाइनमुळे त्याला वेगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे. पारंपरिक नथ, मोठे झुमके, गळ्यातील सोन्याचे दागिने आणि हातातील पारंपरिक अलंकार यांची तिने केलेली निवड तिच्या लूकला रॉयल स्पर्श देते. केसांमध्ये माळलेला लाल गजरा आणि उठावदार आय मेकअप यामुळे तिचा हा पारंपरिक साज अधिकच लक्षवेधी ठरतो.

एकूणच, या अभिनेत्रींच्या दिवाळी लूकमधून पारंपरिक साडीला आधुनिक फॅशनची जोड देण्याचे विविध प्रयोग पाहायला मिळत आहेत. रंगसंगती, दागिन्यांची निवड, नक्षीकाम आणि पारंपरिक केशरचना यांचा योग्य मेळ साधत या अभिनेत्री दिवाळीच्या सणात मराठमोळ्या सौंदर्याची वेगळी छाप पाडताना दिसत आहेत.