मुंबई /नागपूर
Diwali Fire Incidents दिवाळीचा सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच लक्ष्मीपूजनाच्या रात्री आगीच्या घटनांनी अनेक शहरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले. रविवारी फटाक्यांची आतषबाजी आणि काही ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आगी लागल्याच्या घटना घडल्या. या दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. नागपूर शहराला तर आगीच्या घटनांचा मोठा फटका बसला असून, एकाच रात्री शहरात तब्बल ४३ ठिकाणी आग लागल्याची नोंद झाली आहे. यापैकी तीन घटना गंभीर स्वरूपाच्या असल्याची माहिती आहे. देवनगर परिसरातील टीव्हीएस शोरूमला लागलेल्या भीषण आगीत जवळपास ४५ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तर मेडिकल चौकातील एका इमारतीला लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच घबराट पसरली.

नागपुरातील मेडिकल चौक परिसरात लक्ष्मीपूजनाच्या रात्री एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली. या इमारतीच्या तळमजल्यावर अंकुश किराणा स्टोअर्स असून, त्याच्या वरील मजल्यावर ही दुर्घटना घडली. आग लागल्यानंतर वरच्या मजल्यावरून एकामागोमाग एक लहान स्फोटांचे आवाज येऊ लागले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने आग विझवण्याचे काम हाती घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, नागपुरातील देवनगर चौकाजवळील सावरकरनगर परिसरातही आगीची मोठी दुर्घटना घडली. येथील साई डायनामिक्स टीव्हीएस शोरूमला भीषण आग लागली. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हवेत उडवण्यात आलेल्या फटाक्याची ठिणगी सुरुवातीला शोरूमच्या वरच्या शेडवर पडली. त्यानंतर आगीने वेगाने पसरत संपूर्ण परिसराला विळखा घातला. शोरूममध्ये मोठ्या प्रमाणावर दुचाकी उभ्या असल्याने आगीत वाहनांचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत जवळपास ४५ दुचाकी जळाल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूरप्रमाणेच चंद्रपूर शहरातही फटाक्यांच्या ठिणगीमुळे घराला आग लागल्याची घटना घडली. शहरातील बालाजी वॉर्ड परिसरात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. फटाक्याची ठिणगी उडून किशोर भामकर यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्याला आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत घरातील साहित्याचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
एकीकडे दिवाळीचा आनंद आणि रोषणाई सुरू असताना दुसरीकडे फटाक्यांच्या निष्काळजी वापरामुळे अनेक ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्या. नागपूरमध्ये एकाच रात्री ४३ ठिकाणी आग लागल्याच्या घटनांमुळे अग्निशमन यंत्रणेवरही मोठा ताण निर्माण झाला. या घटनांनी सण साजरा करताना फटाके फोडण्याबाबत खबरदारी घेणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.