मुंबई
Farah Khan दिवाळीच्या सणादरम्यान बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान हिच्याबाबत सोशल मीडियावर एक खळबळजनक दावा करण्यात आला. मुंबईतील फराह खानच्या इमारतीला आग लागल्याचा व्हिडीओ एका पापाराझी सोशल मीडिया पेजवरून शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये फराह खानचा फोटो वापरून तिच्या अपार्टमेंटमध्ये आग लागल्याची माहिती देण्यात आली होती. पाहता पाहता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. मात्र, या दाव्यामागील सत्य वेगळेच असल्याचे समोर आल्यानंतर फराह खानने स्वतः पुढाकार घेत संबंधित पेजचा समाचार घेतला. चुकीची माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करू नका, अशा शब्दांत तिने आपली नाराजी व्यक्त केली.

फराह खानने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर संबंधित व्हिडीओ पुन्हा शेअर करत या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवला. व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेली इमारत आपली नसल्याचे तिने स्पष्ट केले. ही इमारत अद्याप बांधकामाधीन असून, तिच्या अपार्टमेंटला आग लागल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे फराहने सांगितले. यावेळी ऑनलाइन पोर्टल्सना जबाबदारीने वागण्याचा सल्लाही तिने दिला. 'ऑनलाइन पोर्टल्सनी कृपया जबाबदारीने वागावे. ही इमारत बांधकाम सुरू असलेली आहे. केवळ क्लिकबेट म्हणजे सर्व काही नाही!' अशा आशयाची प्रतिक्रिया देत तिने दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर नाराजी व्यक्त केली. फराह खान मुंबईतील लोखंडवाला परिसरातील ओबेरॉय स्काय हाइट्स येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीही फराह खान एका वेगळ्याच व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. तिचा स्वयंपाकी दिलीप याच्यासोबत झालेल्या कथित वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दिलीप हा फराहच्या यूट्यूब व्लॉगचा नियमित भाग असल्याने या व्हिडीओची विशेष चर्चा झाली. व्हिडीओमध्ये दिलीप फराहला उद्देशून, 'मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे,' असे म्हणताना दिसतो. त्यावर फराह, 'तू मला समजावणार का?' असे प्रत्युत्तर देते. याचदरम्यान तिचे लक्ष कॅमेऱ्याकडे जाते आणि ती दिलीपला थांबण्यास सांगते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फराहने इन्स्टाग्रामवरून स्पष्टीकरण दिले होते. 'मित्रांनो, कृपया दिलीप आणि माझ्या खासगी आयुष्याचा आदर करा. संपूर्ण सत्य समजून घेतल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढू नका,' अशी विनंती तिने हात जोडणाऱ्या इमोजीसह केली होती.
फराह खान केवळ चित्रपट दिग्दर्शन आणि कोरिओग्राफीसाठीच नव्हे, तर तिच्या यूट्यूब व्लॉग्समुळेही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. तिच्या व्लॉग्समध्ये विविध खाद्यपदार्थांच्या पाककृतींसोबतच ती अनेक सेलिब्रिटींच्या घरी भेट देते. या माध्यमातून चाहत्यांना कलाकारांच्या आलिशान घरांची आणि त्यांच्या जीवनशैलीची झलक पाहायला मिळते. फराहसोबत अनेक वर्षांपासून काम करणारा तिचा स्वयंपाकी दिलीप याचीही या व्लॉग्समधून विशेष ओळख निर्माण झाली आहे. दोघांमधील मजेशीर संवाद आणि नोकझोक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. २०२४ मध्ये फराहने आपली कुकिंग सीरिज सुरू केली होती. या सीरिजच्या नव्या भागांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.एकीकडे फराहच्या इमारतीला आग लागल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर पसरवली जात असताना, दुसरीकडे तिच्या खासगी आयुष्याशी संबंधित व्हिडीओंचीही चर्चा होत आहे. त्यामुळे व्हायरल होणाऱ्या प्रत्येक माहितीची सत्यता तपासणे आणि कोणतीही बातमी प्रसारित करताना जबाबदारीचे भान ठेवणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.