कॅलिफोर्निया,
Fell into the sea from a cruise ship अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या समुद्रात क्रूझ जहाजावरून पडलेल्या एका पियानोवादकाला तब्बल नऊ तासांनंतर सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. समुद्रात सुमारे २० मैल म्हणजेच ३१ किलोमीटर अंतरापर्यंत वाहत गेलेला हा व्यक्ती बराच वेळ जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत होता. अखेर दोन मच्छीमारांच्या नजरेस तो पडल्यानंतर त्याचे प्राण वाचले. ही घटना शुक्रवारी न्यूपोर्ट बीचजवळ घडली. बचाव करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, या व्यक्तीने आपण रॉयल कॅरेबियनच्या १४ डेक असलेल्या 'ओव्हेशन ऑफ द सीज' या क्रूझ जहाजावर पियानोवादक म्हणून काम करत असल्याचे मच्छीमारांना सांगितले. समुद्रातून बाहेर काढल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सुधारण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

सीन नॉर्टन आणि ग्रँट गॅरेट हे दोन मच्छीमार कॅटालिना बेटाजवळ मासेमारी करून आपल्या बोटीतून परतत होते. दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास त्यांना समुद्रात एक व्यक्ती मदतीसाठी संघर्ष करताना दिसली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने मासेमारीचे साहित्य बाजूला ठेवले आणि बोट थांबवली. त्यानंतर दोघांनी मिळून त्या व्यक्तीला बोटीवर घेतले. 'पीपल डॉट कॉम'च्या वृत्तानुसार, सीन नॉर्टन यांनी सांगितले की, बचाव करण्यात आलेला पियानोवादक प्रचंड धक्क्यात होता. शुद्धीवर आल्यानंतर त्याने मच्छीमारांचे आभार मानत आपण आता वाचणार नाही, असे वाटत असल्याचे सांगितले. त्यानंतर मच्छीमारांनी सागरी आपत्कालीन सेवेला या घटनेची माहिती दिली. न्यूपोर्ट बीचचे जीवरक्षक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात हलवले.
स्थानिक अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, संबंधित पियानोवादक शुक्रवारी पहाटे सुमारे २.३० वाजता क्रूझ जहाजावरून समुद्रात पडला असावा. मात्र, तो नेमका कसा पडला, याची अद्याप खात्री झालेली नाही. या घटनेचा तपास अमेरिकेचे कोस्ट गार्ड करत आहे. मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार, समुद्राचे तापमान सुमारे ७६ अंश फॅरेनहाइट म्हणजेच २४.४ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे इतका वेळ समुद्रात राहूनही त्याचे प्राण वाचण्यास मदत झाली असावी. अन्य परिस्थितीत एवढा काळ समुद्रात राहणे जीवघेणे ठरले असते, असे मच्छीमारांनी नमूद केले. दरम्यान, रॉयल कॅरेबियन ग्रुपनेही आपल्या कर्मचाऱ्याशी संबंधित घटना असल्याचे मान्य केले असून त्याला आवश्यक ती मदत दिली जात असल्याचे सांगितले आहे. मात्र, कर्मचाऱ्याच्या गोपनीयतेचे कारण देत कंपनीने त्याची ओळख किंवा अधिक तपशील जाहीर केलेले नाहीत.