मुंबई
Gold and Silver Price दिवाळीचा सण म्हटला की सोने खरेदीला विशेष महत्त्व असते. धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेकजण सोन्या-चांदीची खरेदी करतात. मात्र, यंदा मौल्यवान धातूंचे वाढते दर पाहता ग्राहकांना खरेदी करण्यापूर्वी अनेकदा विचार करावा लागत आहे. काल सोन्या-चांदीचे दर दिवसभर स्थिर राहिल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आज जळगावच्या सराफ बाजारात दोन्ही धातूंच्या दरात पुन्हा मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात तब्बल १ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ४७ हजार ८०५ रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना वाढलेल्या दरांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या दरात आज ३ हजार रुपयांची वाढ झाली असून, जीएसटीसह चांदीचा भाव १ लाख ९६ हजार ७३० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्याने ग्राहकांच्या खरेदीच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो.एकीकडे दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह असताना दुसरीकडे सोन्या-चांदीच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात या दरांमध्ये आणखी चढ-उतार होतात का, याकडे सराफ बाजारासह ग्राहकांचे लक्ष लागले आहे.