दिवाळीच्या रात्री राज्यभरात आगींचे तांडव!

    दिनांक :09-Nov-2026
Total Views |
मुंबई
Maharashtra Diwali Fire
राज्यभरात दिवाळीचा उत्साह सुरू असतानाच लक्ष्मीपूजनाच्या रात्री अनेक ठिकाणी आगीच्या घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले. फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांमुळे लागलेली आग आणि शॉर्टसर्किट अशा विविध कारणांमुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. भिवंडी, मुंबई, विरार, नागपूर, चिपळूण आणि धाराशिव येथे आगीच्या गंभीर घटना घडल्या. भिवंडीत तर एका दिवसात पाच ठिकाणी आग लागली असून, काप आळी परिसरात सहा दुकाने जळून खाक झाली आहेत.


भिवंडी शहरात गेल्या २४ तासांत आगीच्या पाच घटना घडल्या. सोनाळे येथील भंगार गोदामाला दुपारच्या सुमारास आग लागली. मध्यरात्रीनंतर कामतघरमधील ओसवालवाडी परिसरात फटाक्यांमुळे बॅटरी कारखान्याला आग लागली. गौरीपाडा परिसरातील चाळीतील पाच खोल्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. कामतघरच्या गणेशनगरमध्ये दुकानात लावलेल्या दिव्यामुळे बॅगच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली. तर काप आळी परिसरात शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून सहा दुकाने जळून खाक झाली.

काप आळीतील आगीत कुलर विक्रीचे दुकान, एलईडी डेकोरेशन लाइट्सचे दुकान, गुलाबजाम विक्रीचे दुकान, चप्पल दुकान आणि कपड्यांच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र, आगीची तीव्रता वाढत असल्याने नंतर आणखी दोन गाड्या बोलावण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत दुकानांमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते.

विरार पश्चिमेकडील एचडीआयएल कॉम्प्लेक्समधील निवासी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका घराला रविवारी रात्री सुमारे दहा वाजता आग लागली. काही वेळातच आगीने मोठे रूप धारण केले आणि ज्वाळा वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचल्या. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. सुदैवाने आग लागली त्यावेळी घरात कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली. घरातील दिव्यांमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज असून, आगीचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

मुंबईतील विद्याविहार रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या स्कायलाईन विहार या व्यावसायिक इमारतीलाही रविवारी रात्री सुमारे अकरा वाजता आग लागली. इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यांवर लागलेली आग हळूहळू खालच्या मजल्यांपर्यंत पसरली. सुमारे तासाभरात आगीने रौद्र रूप धारण केले. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे प्रयत्न करत होते. रविवारची सुट्टी असल्याने इमारतीत कर्मचारी असण्याची शक्यता कमी होती. या आगीत इमारतीचे तीन मजले जळून खाक झाले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

नागपुरातही दिवाळीच्या रात्री आगीच्या दोन मोठ्या घटना घडल्या. मेडिकल चौक परिसरातील अंकुश किराणा स्टोअर्सच्या वरच्या मजल्यावर आग लागली. आग लागल्यानंतर इमारतीतून एकामागोमाग एक छोटे स्फोट झाल्याचे आवाज ऐकू आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.

दुसरी घटना देवनगर चौकाजवळील सावरकरनगर परिसरात घडली. येथील साई डायनामिक्स टीव्हीएस शोरूमला आग लागली. फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान हवेतून आलेल्या फटाक्यामुळे शोरूमच्या वरच्या शेडला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आगीने इमारतीतील भागाला वेढले. शोरूममध्ये काही वाहने उभी असल्याने त्यांपैकी काही गाड्यांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे.

मुंबईतील डोंगरी परिसरातही रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मोठी आग लागली. डोंगरी पोलीस ठाण्यासमोरील एका गॅरेजला लागलेल्या आगीने काही वेळातच आजूबाजूच्या दुकानांनाही विळखा घातला. या घटनेत जवळपास १० ते १२ दुकाने जळून खाक झाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आणि महापालिकेच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिस, महापालिका कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी खबरदारी म्हणून गॅरेजजवळील तीन निवासी इमारती रिकाम्या केल्या. तसेच परिसरातील वीजपुरवठाही बंद करण्यात आला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली; मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार परिसरात तेलाचे आणि टायरचे गाळे असल्याने आग अधिक भडकली आणि मोठ्या प्रमाणात धूर पसरला. अग्निशमन दलाने या आगीला दुसऱ्या स्तरावरील आग घोषित केले होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेतही लक्ष्मीपूजनाच्या वेळी मोठा अनर्थ टळला. रात्री पावणेआठच्या सुमारास छाया फोटो स्टुडिओसमोरून जाणाऱ्या एमएच ०८ एके ५७९९ क्रमांकाच्या वॅगनार कारखाली आकाशात उडणारा फटाका फुटला. फटाका गाडीखाली अडकल्याने त्याचे स्फोट होत राहिले. काही अंतर पुढे गेल्यानंतर कारच्या इंजिनच्या बाजूने आग लागली. ही कार सीएनजीवर चालणारी असल्याने आग गॅस टाकीपर्यंत पोहोचली असती, तर मोठा स्फोट होण्याची भीती होती. मात्र, प्रसंगावधान राखत व्यापारी आणि नागरिकांनी कारमधील पती-पत्नीला तातडीने बाहेर काढले. त्यानंतर पाणी टाकून आग विझवण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी शिवारात विद्युत स्पार्किंगमुळे लागलेल्या आगीत १३ एकर ऊस जळून खाक झाला. ऊस तोडणीसाठी तयार असतानाच ही घटना घडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग लागल्यानंतर शेतकऱ्यांनी ती विझवण्याचे प्रयत्न केले; मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने त्यांना यश आले नाही. या घटनेत बाळासाहेब देशमुख यांचा चार एकर, पोपट देशमुख यांचा चार एकर, विठ्ठल देशमुख यांचा तीन एकर, सदानंद देशमुख यांचा एक एकर आणि गजानन देशमुख यांचा एक एकर ऊस जळाला. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या नुकसानीमुळे मोठे संकट उभे राहिले आहे.

एकीकडे दिवाळीचा आनंद आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना दुसरीकडे आगीच्या या घटनांनी अनेकांचे मोठे नुकसान केले. काही ठिकाणी सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी दुकाने, घरे, वाहने आणि शेतीचे मोठे नुकसान झाल्याने दिवाळीच्या उत्सवावर या दुर्घटनांचे सावट पसरले.