मुंबई
Maharashtra Weather Update नोव्हेंबर महिना सुरू होताच महाराष्ट्रातील हवामानात बदल जाणवू लागला आहे. दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री गारवा, असे संमिश्र वातावरण सध्या राज्यातील अनेक भागांत अनुभवायला मिळत आहे. त्यातच आगामी काही दिवसांत रात्रीच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवसांत राज्यातील किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होऊ शकते. त्यामुळे राज्यात हळूहळू थंडीचा प्रभाव वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवस राज्यातील कमाल तापमानात विशेष बदल होण्याची शक्यता नाही. दिवसा उन्हाचा प्रभाव कायम राहणार असला, तरी सूर्यास्तानंतर वातावरणात गारवा वाढू शकतो. विशेषतः पहाटेच्या वेळी थंडी अधिक जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे संमिश्र वातावरण राज्यातील अनेक भागांत पाहायला मिळेल.
९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. या भागांत पावसाची शक्यता कमी असून हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. त्यामुळे शेतकरी, प्रवासी आणि बाहेरगावी जाण्याचे नियोजन करणाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.विदर्भातील जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता कमी असून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागातील किमान तापमानात हळूहळू घट होऊ शकते. परिणामी, सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडीचा अनुभव वाढण्याची शक्यता आहे.दिवसा आणि रात्रीच्या तापमानातील फरक लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी पहाटे तसेच रात्री घराबाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करावा. दिवसा उन्हाचा प्रभाव कायम राहणार असल्याने पुरेसे पाणी पिणेही महत्त्वाचे आहे.
एकंदरीत, आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता असून दिवसा तापमान स्थिर, तर रात्री आणि पहाटे गारवा वाढण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबरच्या पुढील काळात थंडीचा जोर किती वाढणार, याकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.