लिओनेल मेस्सीने रचला इतिहास, सलग दुसऱ्यांदा पटकावला 'गोल्डन बूट' पुरस्कार

    दिनांक :09-Nov-2026
Total Views |
मियामी (फ्लोरिडा)
messi golden-boot आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वात आपल्या नावाचा डंका वाजवणारा लिओनेल मेस्सी याने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. इंटर मियामी सीएफ संघाचा कर्णधार असणाऱ्या मेस्सीने 2026 च्या नियमित हंगामात  शानदार खेळ करत तब्बल 26 गोल नोंदवले. यासह, मेजर लीग सॉकरच्या (MLS) संपूर्ण इतिहासात सलग दोनदा 'गोल्डन बूट' पुरस्कार जिंकणारा तो जगातील पहिला आणि एकमेव फुटबॉलपटू ठरला आहे. या यंदाच्या हंगामात मेस्सीने केवळ गोलच केले नाहीत, तर आपल्या सहकाऱ्यांसाठी १७ असिस्ट्सही दिले. यामुळे त्याचे नियमित हंगामातील गोल आणि असिस्ट्सचे एकूण योगदान 43 वर पोहोचले. गोल्डन बूटच्या या अटीतटीच्या शर्यतीत मेस्सीने एफसी डॅलसचा स्ट्रायकर पीटर मोझेस (22 गोल) आणि नॅशविल एससीचा सॅम सरिज (21 गोल) यांसारख्या तगड्या खेळाडूंना मागे टाकले. तर व्हँकुव्हर व्हाईटकॅप्सचा ब्रायन व्हाईट 20 गोलांसह चौथ्या स्थानावर राहिला.
 
messi

अखेरच्या सामन्यात रोमहर्षक ड्रॉ
शार्लट एफसी विरुद्ध खेळल्या गेलेल्या इंटर मियामीच्या अंतिम नियमित-हंगाम सामन्यात मेस्सीला गोल करता आला नाही आणि हा सामना 3-3 असा चुरशीचा व बरोबरीत सुटला. घरच्या मैदानावर खेळताना मियामीने सुरुवातीला 3-0 अशी भक्कम आघाडी घेतली होती. मात्र, शार्लटने धमाकेदार पुनरागमन करत सामना बरोबरीत सोडवला. जरी हा सामना जिंकता आला नाही, तरी मेस्सीच्या विक्रमी 'गोल्डन बूट' विजयावर याचा कोणताही परिणाम झाला नाही.
मेस्सीपूर्वी लीगच्या इतिहासात हा सन्मान दोनदा मिळवणारे मोजकेच खेळाडू झाले आहेत, ज्यामध्ये ब्रॅडली राइट-फिलिप्स, ख्रिस वोंडोलोस्की, जेफ कनिंगहॅम, टेलर ट्वेलमन आणि प्रेकी यांचा समावेश आहे. मात्र, या सर्व दिग्गजांना मागे टाकत सलग दोनदा हा बहुमान मिळवणारा मेस्सी हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी 2025 च्या हंगामातही मेस्सीने 29 गोल आणि 19 असिस्ट्ससह हाच किताब पटकावला होता.