फटाके फोडण्यास विरोध केल्याने युवकाचा खून

    दिनांक :09-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर
Diwali मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जात असताना रस्त्यात फटाके फोडण्यावरुन आरडाओरड केल्याच्या कारण्यावरून झालेल्या वादातून एका युवकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. अमन उर्फ बॉबी सुनील सपाटे (२७, जयभोले सोसायटी, पिपळा फाटा, हुडकेश्वर) असे मृतक युवकाचे नाव आहे. बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेहमी गजबजलेल्या देवनगरात हे हत्याकांड घडले.
 

Nagpur Crime 27-Year-Old Man Stabbed to Death After Dispute Over Diwali Firecrackers 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या मध्यरात्रीनंतर १२.३० वाजण्याच्या सुमारास, अक्षय गंगाधर नौकरकर (३१, देवनगर, बजाजनगर) हा त्याचा मित्र अमन उर्फ बॉबी सुनील सपाटे आणि इतर एका मित्रासह कारने जात होते. त्यांचा मित्र प्रसाद राऊत (देवनगर) यांच्या वाढदिवसानिमित्त ते पार्टीसाठी निघाले होते. त्या दरम्यान, बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवनगर चौकातील ज्यूस दुकानासमोर काही युवक रस्त्यावर फटाके फोडत होती. कार चालवत असलेल्या नौकरकर याच्या मित्राने त्यांना बाजूला होण्यास व फटाके हटवण्यास सांगितले. याचा राग आल्यामुळे, फटाके फोडणारा मुख्य आरोपी अक्षय मडावी आणि त्याचे इतर दोन ते तीन साथीदार यांनी नौकरकर आणि बॉबी यांच्यासोबत वाद घातला. या भांडणात आरोपीने आपल्या जवळील चाकुने बॉबी याच्या पोटावर सपासप वार केले. हल्ल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी बॉबी याला तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल हॉस्पिटल) हलवण्यात आले. मात्र, तिथे पोहोचण्यापूर्वी किंबहूना पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. या प्रकरणी अक्षय नौकरकर याने दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येनंतर फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.