अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur Crime News कामावरून घरी परतणाऱ्या ३२ वर्षीय महिलेचा पाठलाग करून तिच्याशी अश्लील व असभ्य वर्तन केल्याची धक्कादायक घटना कळमना हद्दीत उघडकीस आली. विशेष म्हणजे, रात्री उशिरा महिला आपल्या मुलीसह घरी झोपलेली असताना दोघे आरोपी तिच्या घरात शिरले आणि मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. या प्रकरणी कळमना पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३२ वर्षीय महिला कळमना हद्दीत वास्तव्यास आहे. आरोपींपैकी धुरु कैलाश बुवाडे (वय २७, रा. परसठाणे, पोस्ट करपा, ता. मुलताई, जि. बैतूल, मध्य प्रदेश) हा महिलेच्या परिचयातील होता. त्याचा मित्र सचिन विनयकुमार पांडे (वय २९, रा. केजीएन सोसायटी, गिट्टीखदान) याच्यासह त्याने हा प्रकार केल्याचा आरोप आहे. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास पीडित महिला कामावरून घरी परतत असताना दोन्ही आरोपींनी तिचा पाठलाग केला. त्यानंतर रात्री ११.४० ते ११.५० वाजताच्या दरम्यान महिला तिच्या मुलीसह घरी झोपलेली असताना आरोपी तिच्या घराजवळ पोहोचले. त्यांनी घराचा दरवाजा वाजवून महिलेच्या घरात शिरले. तिच्याशी असभ्य आणि अश्लील भाषेत संवाद साधला. त्यांच्या या वर्तनामुळे महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या महिलेने कळमना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७८, ७९, ७५ (१), ७५(२), ३३३ आणि ३ (५) अन्वये गुन्हा नोंदविला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कळमना पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी तत्परतेने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली.