ऐन दिवाळीच्या दिवशी शिक्षक दाम्पत्याची आत्महत्या

    दिनांक :09-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
Nagpur Diwali Tragedy
गडचिरोली-सूरजागढ येथील एका नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या दाम्पत्याने नागपुरातील बेलतरोडीत असलेल्या घरात सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ऐन दिवाळीच्या दिवशी उघडकीस आली. या प्रकरणी बेलतरोडी पोलिस ठाण्यात दाम्पत्याच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. मनीष प्रल्हाद गणवीर (३८,रेवतीनगर, बेलतरोडी) आणि सोनाली मनीष गणवीर (३५, प्लॉट क्रमांक १७८, रेवतीनगर, बेसा) अशी आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे.




पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष गणवीर आणि सोनाली गणवीर हे दोघेही शिक्षक होते. दोघांनीही गेल्या ऑगस्ट महिन्यात विवाह केला होता. दिवाळीच्या सुटीत ते बेलतरोडीतील घरी सण साजरा करण्यासाठी आले होते. प्रशिक अजय लांडगे (२६, गल्ली क्रमांक १९, एकात्मतानगर, जयताळा) दिवाळीच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास नातेवाईक मनीष गणवीर आणि सोनाली गणवीर यांच्या घरी गेले होते. घरी पोहोचल्यानंतर घराचा दरवाजा वाजवला, परंतु आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने त्यांनी घराच्या टीनाच्या शेडवरून दुसऱ्या माळ्याच्या गॅलरीत प्रवेश केला आणि खिडकीतून आत डोकावून पाहिले. त्यावेळी बेडरुममध्ये पती-पत्नी दोघेही सिलींग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. या प्रकारानंतर लांडगे यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच बेलतरोडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह पुढील कार्यवाहीस्तव मेडिकल रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी प्राप्त सूचनेवरून बेलतरोडी ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक संतोष आंधळे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमागील नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.