अनिल कांबळे
नागपूर,
POCSO अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध, पळून जाऊन विवाह आणि त्यानंतर सहजीवन. या प्रकरणाचा उलगडा अखेर प्रसूतीदरम्यान झाला. मेयो रुग्णालयात ५ नोव्हेंबर रोजी एका अल्पवयीन मुलीने मुलीला जन्म दिल्यानंतर तिच्या वयाचा मुद्दा समोर आला आणि २० वर्षीय पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. पाचपावली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यानुसार (पॉक्सो) कारवाई सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि अल्पवयीन मुलगी एकाच परिसरात शेजारी राहत होते. त्यांची घरे समोरासमोर असून, दोघांचीही लहानपणापासून ओळख होती. कालांतराने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये मुलगी १८ वर्षांखालील असताना आरोपी तिला नागपूरबाहेर घेऊन गेला आणि प्रेमविवाह केल्याची माहिती आहे. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही त्याने लग्न केले. त्यानंतर तिला घरी आणून पत्नी म्हणून कुटुंबीयांशी ओळख करून दिली. कुटुंबीयांनीही तिला स्वीकारल्याने ती आरोपीसोबत राहू लागली.
प्रसूतीदरम्यान वयाचा उलगडा
या काळात दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आणि मुलगी गर्भवती राहिली. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३८ वाजताच्या सुमारास तिने मेयो रुग्णालयात मुलीला जन्म दिला. रुग्णालयातील प्रक्रियेदरम्यान तिचे वय समोर आले. मुलीने दिलेल्या माहितीनुसार, तिचा जन्म १६ मे २००८ रोजी झाला असून, कथित संबंध सुरू झाले तेव्हा ती अल्पवयीन होती. तिच्या जबाबाच्या आधारे पाचपावली पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एल) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.