मुंबई
Old Monk Rum महाराष्ट्रातील मद्यप्रेमींसाठी दिवाळीच्या काळात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय ‘ओल्ड मंक’ रमची विक्री राज्यात पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली या ब्रँडची विक्री आता नव्या लेबलसह पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. बाटलीवरील माहितीमध्ये आवश्यक बदल करण्यास कंपनीने तयारी दर्शवली असून, मुंबई उच्च न्यायालयातील याचिकाही मागे घेतली आहे. त्यामुळे ओल्ड मंकच्या पुनरागमनाची तयारी सुरू झाली आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) मे महिन्यात खोपोली येथील ओल्ड मंकच्या उत्पादन कारखान्याची तपासणी केली होती. या पाहणीत रम तयार करण्यासाठी न्यूट्रल स्पिरिट्स आणि रम फ्लेवरिंगचा वापर होत असल्याचे आढळले. त्यामुळे या उत्पादनाची विक्री केवळ ‘रम’ या नावाने करता येणार नाही, असा आक्षेप प्राधिकरणाने नोंदवला होता. त्याचबरोबर बाटलीवर छापण्यात आलेले ‘७ इयर्स ओल्ड ब्लेंडेड’ हे वर्णनही दिशाभूल करणारे असल्याचे सांगण्यात आले. कारण संबंधित मद्य लाकडी पिंपांमध्ये सात वर्षे मुरवलेले नसल्याचे प्राधिकरणाच्या तपासणीत स्पष्ट झाले होते.
FSSAI च्या नियमानुसार मद्याला विशिष्ट चव देण्यासाठी ठरवून दिलेल्या तांत्रिक निकषांनुसारच घटकांचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र, ओल्ड मंकच्या उत्पादनात बाहेरून कृत्रिम फ्लेवर्स मिसळले जात असल्याचे तपासात समोर आले होते. तरीही बाटलीच्या लेबलवर कृत्रिम स्वादाचा वापर केल्याची माहिती नमूद केली जात नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. ग्राहकांना उत्पादनातील घटकांविषयी योग्य माहिती न देणे ही ग्राहकांची दिशाभूल ठरू शकते, असे प्राधिकरणाचे म्हणणे होते. या कारणांमुळे ओल्ड मंकच्या विक्रीवर निर्बंध आले होते.
प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाकडून अपेक्षित दिलासा न मिळाल्यानंतर कंपनीने आपल्या भूमिकेत बदल करण्याची तयारी दर्शवली. बाटलीच्या लेबलवर ‘अतिरिक्त स्वाद’ असल्याचा उल्लेख ठळकपणे करण्यास तसेच ‘७ वर्षे जुने’ हे वर्णन हटवण्यास कंपनी सहमत झाली आहे. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी कंपनीने न्यायालयातील याचिका मागे घेतली. त्यामुळे नव्या लेबलसह उत्पादन पुन्हा बाजारात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ओल्ड मंकची विक्री बंद राहिल्याचा फटका राज्य सरकारच्या अबकारी महसुलालाही बसला आहे. गेल्या पाच महिन्यांत या ब्रँडची विक्री थांबल्याने महाराष्ट्र सरकारला सुमारे ३५० कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी राज्याला सर्व प्रकारच्या मद्यविक्रीतून एकूण २९ हजार ९५७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.
आता लेबलवरील आवश्यक बदलांसह ओल्ड मंक पुन्हा बाजारात दाखल होण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून या रमची प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांना लवकरच ती पुन्हा उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.