आधी जिंकवले, नंतर लाखोंनी गंडवले!

    दिनांक :09-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
Online Ludo Scam
ऑनलाइन गेममध्ये सुरुवातीला जिंकवून विश्वास संपादन करायचा आणि नंतर खेळाचा निकाल आपल्या बाजूने फिरवून लाखोंचा गंडा घालायचा, अशी सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे. ऑनलाइन लुडो गेममधून पैसे कमावण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या नागपुरातील २३ वर्षीय एमबीबीएसच्या विद्यार्थ्याला तब्बल १२ लाख ३३ हजार १८४ रुपयांचा फटका बसला. तब्बल नऊ महिन्यांच्या कालावधीत २८४ आर्थिक व्यवहार करून ही रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप आहे. अक्षय पाटील (२३) असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कुमठे गावचा रहिवासी असून, सध्या नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) मुलांच्या वसतिगृह क्रमांक ५ मध्ये राहतो. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

यूट्यूबवरील जाहिरातीतून सापळा


अक्षय यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असताना त्याला ‘ट्राय प्लेयर्स’ या ऑनलाइन लुडो गेमिंग अ‍ॅपची जाहिरात दिसली. या गेममधून पैसे कमावता येतील, या आमिषाने त्याने जाहिरातीतील लिंकवर क्लिक केले. त्यानंतर एपीके फाइल डाउनलोड करून मोबाइल क्रमांकाच्या आधारे अ‍ॅपवर नोंदणी केली. सुरुवातीच्या खेळांमध्ये अक्षय जिंकला की त्याच्या बँक खात्यात रक्कम जमा होत होती. त्यामुळे गेम खरा असून त्यातून पैसे मिळू शकतात, असा त्याचा समज झाला. या पद्धतीने विश्वास संपादन केल्यानंतर त्याने मोठ्या रकमेच्या पैजा लावण्यास सुरुवात केली.



नऊ महिन्यांत रक्कम गायब

सुरुवातीला अक्षयला जिंकवून विश्वासात घेतल्यानंतर गेमचा निकाल आपल्या सोयीनुसार नियंत्रित करून अक्षयला सातत्याने हरविण्यात आल्याचा आरोप आहे. विविध यूपीआय आयडींचा वापर करून आरोपींनी त्याच्याकडून २८४ आर्थिक व्यवहारांद्वारे एकूण १२,३३,१८४ रुपये घेतले. १ जानेवारी ते १९ सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार सुरू होता. मोठी रक्कम गमावल्यानंतर अक्षयला फसवणुकीची जाणीव झाली. त्याने पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपींनी प्रतिसाद देणे बंद केले. त्याचा मोबाइल क्रमांकही ब्लॉक केल्याने संपर्काचा मार्ग बंद झाला.

अ‍ॅप डाउनलोड करताना सावधान!

ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून पैसे कमावण्याचे आमिष दाखवणाऱ्या अनोळखी जाहिराती आणि संकेतस्थळांपासून सावध राहण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे. विशेषतः अधिकृत अ‍ॅप स्टोअरबाहेरून एपीके फाइल डाउनलोड करणे धोकादायक ठरू शकते. सुरुवातीला पैसे मिळाले म्हणजे अ‍ॅप विश्वासार्ह आहे, असे समजणेही चुकीचे ठरू शकते. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिस करीत आहेत. आरोपींनी वापरलेल्या मोबाइल क्रमांकांचा, यूपीआय आयडींचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करून फसवणुकीची साखळी शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.