वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आता पाळीव प्राण्यांसाठी खास सोय

    दिनांक :09-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
pets now available in Vande Bharat Express अनेकांना लांबच्या प्रवासाला जाताना आपल्या पाळीव प्राण्यांना घरी सोडणे कठीण जाते. विशेषतः कुटुंबासोबत अनेक दिवसांच्या प्रवासाचे नियोजन करताना पाळीव प्राण्यांची व्यवस्था कशी करायची, हा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रवाशांसाठी वंदे भारत स्लीपर ट्रेनमधील पाळीव प्राण्यांसाठीच्या विशेष सुविधेची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर याबाबत एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हिडिओमध्ये पिंजऱ्यासारखा स्वतंत्र बॉक्स दिसत आहे. त्याला दरवाजा आणि तो बंद करण्यासाठी कडी देण्यात आली आहे. तसेच कुत्र्यांसाठी खाद्य आणि पाणी ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था असल्याचे दिसते. लांब पल्ल्याच्या, विशेषतः रात्रीच्या प्रवासात कुत्र्यांना सुरक्षितपणे ठेवण्यासाठी ही सुविधा असल्याचे सांगितले जात आहे.मात्र, रेल्वेच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने 'डॉग बॉक्स'चा उल्लेख आहे. त्यामुळे या सुविधेत मांजरी किंवा इतर लहान पाळीव प्राण्यांना परवानगी आहे, असे गृहीत धरता येणार नाही.
 
 
 
vandebharat
 
रेल्वेत कुत्रा नेण्याचे सध्याचे नियम काय?
भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, प्रवासी ब्रेक व्हॅनमधील डॉग बॉक्समध्ये कुत्र्यांना घेऊन जाऊ शकतात. तसेच फर्स्ट एसी किंवा फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही अटींच्या अधीन राहून कुत्रा सोबत ठेवण्याची परवानगी मिळू शकते. यासाठी इतर सहप्रवाशांची संमती आवश्यक असते.मात्र, एसी टू-टियर, एसी थ्री-टियर, एसी चेअर कार, स्लीपर क्लास आणि सेकंड क्लासच्या डब्यांमध्ये पाळीव प्राणी नेण्यास परवानगी नाही.
 
 
कुत्र्याला ट्रेनमधून नेण्यासाठी किती शुल्क?
रेल्वेच्या सध्याच्या नियमांनुसार, ब्रेक व्हॅनमधील डॉग बॉक्ससाठी कुत्र्याचे अंदाजित वजन 30 किलो धरून शुल्क आकारले जाते. फर्स्ट एसी किंवा फर्स्ट क्लासमध्ये कुत्रा सोबत नेल्यास 60 किलो अंदाजित वजनानुसार शुल्क आकारले जाते.प्रवासादरम्यान कुत्र्याच्या खाण्यापिण्याची आणि देखभालीची जबाबदारी मालकाची असते. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी आवश्यक व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे.
 
 
 
डॉग बॉक्सचे बुकिंग कसे करायचे?
डॉग बॉक्सची सुविधा घेण्यासाठी प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट असणे आवश्यक असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे. आरएसी किंवा प्रतीक्षा यादीवरील तिकिटांवर ही सुविधा उपलब्ध नसते. एका पीएनआरवर एका पाळीव प्राण्याला परवानगी असल्याचेही सांगितले जाते.मात्र, प्रत्येक ट्रेन आणि मार्गावर डॉग बॉक्स उपलब्ध असेलच असे नाही. त्यामुळे तिकीट बुक करण्यापूर्वी संबंधित रेल्वे स्थानकाच्या पार्सल कार्यालयात उपलब्धता, बुकिंग प्रक्रिया आणि शुल्क यांची माहिती घ्यावी.
 
 
कोणती कागदपत्रे आवश्यक? 
कुत्र्याला ट्रेनमधून घेऊन जाण्यासाठी पार्सल कार्यालयात आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. यामध्ये प्रवासाच्या 24 ते 48 तास आधीचे पशुवैद्यकीय आरोग्य प्रमाणपत्र आणि लसीकरणाच्या नोंदींचा समावेश असू शकतो. प्रवासापूर्वी संबंधित रेल्वे स्थानकाच्या पार्सल कार्यालयाशी संपर्क साधून अद्ययावत नियम, आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क यांची खात्री करून घेणे आवश्यक आहे.