वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

    दिनांक :09-Nov-2026
Total Views |
सांगली
Tukaram Mote
सांगली दिवाळीची सुट्टी घालवण्यासाठी आपल्या मूळ गावी आलेल्या वसई येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशांचा विजेचा तीव्र धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. तुकाराम ऊर्फ अजित पतंगराव मोटे (वय ४३) असे मृत न्यायाधीशांचे नाव आहे. सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील देशिंग या त्यांच्या मूळ गावी ही घटना घडली. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मोटे कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत न्यायाधीश पदापर्यंत मजल मारणाऱ्या मोटे यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.



देशिंग गावात शनिवारी न्यायाधीश मोटे यांच्या घरालगत असलेल्या शेतातील उसाच्या फडाला अचानक आग लागली होती. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे पाहण्यासाठी मोटे शेताकडे गेले. मात्र, शेतात जमिनीवर तुटून पडलेल्या ११ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या संपर्कात ते आले. विजेचा धक्का इतका तीव्र होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. उसाच्या शेताला लागलेल्या आगीचे कारण पाहण्यासाठी गेलेल्या मोटे यांच्यावर काळाने घाला घातल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

तुकाराम मोटे यांनी लहानपणापासूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत शिक्षण पूर्ण केले होते. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी न्यायाधीश पदापर्यंत मजल मारली. सध्या ते पालघर जिल्ह्यातील वसई न्यायालयात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यांच्या यशस्वी वाटचालीचा देशिंग गावासह परिसरातील अनेकांना अभिमान होता.

या घटनेमुळे मोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.