सोनू निगमच्या लेकाची संगीतविश्वात दमदार एंट्री!

    दिनांक :09-Nov-2026
Total Views |
मुंबई
Sonu Nigam
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रसिद्ध गायक सोनू निगम याने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. सोनूचा १९ वर्षीय मुलगा निवान निगम याने संगीतविश्वात पदार्पण केले असून, त्याच्या पहिल्या शॉर्ट फिल्मला 'स्लाइड' (SLIDE) संगीत दिले आहे. मुलाच्या या नव्या प्रवासामुळे सोनू निगम प्रचंड आनंदी आहे. त्याने पत्नी मधुरिमा निगम हिच्यासोबत सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत निवानच्या संगीत क्षेत्रातील पदार्पणाची माहिती दिली. यासोबतच लहानपणापासून आतापर्यंत निवानमध्ये झालेले बदल, त्याने घेतलेले प्रशिक्षण आणि संगीतासाठी केलेली मेहनत यांचाही भावनिक प्रवास चाहत्यांसमोर मांडला आहे.




सोनू निगमने आपल्या पोस्टमध्ये निवानच्या बालपणीच्या गायनापासून ते पहिल्या स्वतंत्र म्युझिकल प्रोजेक्टपर्यंतच्या प्रवासाची झलक दाखवली आहे. निवानने केवळ संगीत क्षेत्रात पाऊल ठेवले नाही, तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत घेतल्याचेही त्याने सांगितले. मुलाच्या शारीरिक बदलांसोबतच त्याच्या आत्मविश्वासात झालेली वाढ, गायनाचे प्रशिक्षण आणि नृत्यकौशल्य विकसित करण्यासाठी घेतलेले परिश्रम यांचा उल्लेख सोनूने केला आहे. विशेष म्हणजे, निवानच्या बालपणीच्या काही परफॉर्मन्सचे व्हिडीओही त्याने शेअर केले आहेत. त्यावेळी निवान अवघ्या चार वर्षांचा होता.

निवानच्या बदललेल्या व्यक्तिमत्त्वाविषयी सांगताना सोनूने त्याच्या मेहनतीचे विशेष कौतुक केले. एकेकाळी वडिलांसमोर गाण्यासाठीही लाजणारा निवान आज व्यावसायिक वोकल कोचच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव करत आहे. गायनाचा सराव, डान्स रिहर्सल आणि फिटनेस रूटीन यावर तो नियमितपणे काम करत असल्याचे सोनूने सांगितले. आपल्या मुलाने संगीत क्षेत्रात स्वतःची वाट निवडल्याचा आनंदही त्याच्या पोस्टमधून व्यक्त झाला.

या पोस्टमध्ये सोनू निगमने लिहिले की, दिवाळीच्या पवित्र आणि मंगलमय मुहूर्तावर निवान संगीतविश्वातील आपला प्रवास सुरू करत आहे. आजोबा आणि वडिलांच्या मार्गापेक्षा वेगळी वाट निवडून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. लहानपणी गोलमटोल असलेला निवान आज सडपातळ आणि तरुण झाला आहे. एकेकाळी वडिलांसमोर गाण्यासही संकोच करणारा मुलगा आता आपल्या वोकल कोचने शिकवलेल्या व्यायामांचा दररोज तब्बल १६ तास सराव करत आहे. प्रसिद्ध संगीतकार पू बेअर (Poo Bear) यांच्यासोबत स्टुडिओमध्ये त्याने एकाच प्रयत्नात उत्कृष्ट रेकॉर्डिंग केल्याचेही सोनूने नमूद केले.

पुढे त्याने निवानच्या फिटनेस आणि नृत्याच्या सरावाविषयीही सांगितले. पूर्वी अवघे तीन मिनिटे जॉगिंग केल्यानंतर थकणारा निवान आता आपली कौशल्ये सुधारण्यासाठी तासन्‌तास डान्स प्रॅक्टिस करतो. त्याच्या या मेहनतीमुळे संपूर्ण कुटुंब आनंदी आणि कृतज्ञ असल्याची भावना सोनूने व्यक्त केली. विशेष म्हणजे, मुलासाठी 'अभिमान' किंवा 'गर्व' यांसारखे शब्द वापरणे आपण टाळतो, असेही त्याने मिश्किलपणे नमूद केले.

निवानच्या संगीतप्रवासाला लहान वयातच सुरुवात झाली होती. अवघ्या चार वर्षांचा असताना त्याने स्टुडिओमध्ये 'कोलावेरी डी' हे गाणे गायले होते. त्यानंतर साडेचार वर्षांच्या वयात त्याने रंगमंचावर 'अभी मुझमें कहीं' हे गाणे सादर केले होते. त्या काळापासूनच चाहत्यांकडून मिळणारे प्रेम निवानसाठी मोलाचे असल्याचे सोनूने सांगितले. पुढील प्रवासातही त्याने मेहनत, जिद्द, नम्रता आणि प्रतिष्ठा कायम राखावी, यासाठी चाहत्यांनी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन त्याने केले. अखेरीस 'स्लाइड' या निवानच्या पहिल्या म्युझिकल प्रोजेक्टची ओळख करून देत सोनूने चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सोनू निगमच्या शस्त्रक्रियेचीही चर्चा झाली होती. शस्त्रक्रिया सुरू असताना ऑपरेशन थिएटरमध्ये सोनू मोहम्मद रफी यांचे 'सुहानी रात ढल चुकी' हे गाणे गात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वेदना होत असतानाही त्याने आपला संगीताचा उत्साह कायम ठेवला होता. या अनुभवाला त्याने 'जॉय ऑफ म्युझिक' असे संबोधले होते. त्याच्या या कृतीचे चाहत्यांनी कौतुक केले होते. आता मुलाच्या संगीतविश्वातील पदार्पणामुळे सोनू निगम पुन्हा एकदा चर्चेत आला असून, निवानच्या पुढील वाटचालीकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.