कैरोजवळ रेल्वे अपघाताचा थरार; चार ठार, ८८ जखमी!

    दिनांक :09-Nov-2026
Total Views |
कैरो,
इजिप्तमध्ये दोन प्रवासी रेल्वेंची समोर आलेली भीषण धडक मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरली आहे. रविवारी राजधानी कैरोच्या दक्षिणेकडील गिझा प्रांतातील अल-अय्यात जिल्ह्यात हा अपघात घडला. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून ८८ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताचे ठिकाण कैरोपासून सुमारे ५२ किलोमीटर अंतरावर आहे. फय्यूम प्रांताच्या दिशेने जाणाऱ्या एका रेल्वेने अस्वान प्रांताकडे रवाना झालेल्या दुसऱ्या रेल्वेला मागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की यातील एका रेल्वेचे डबे रुळावरून घसरले. मात्र, नेमकी कोणती रेल्वे रुळावरून घसरली, याबाबत परिवहन मंत्रालयाने स्पष्ट माहिती दिलेली नाही.
 
 
kairo
इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून ८८ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. रेल्वे मार्गावरील अडथळे दूर करण्यासाठी क्रेन आणि अन्य यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे. रेल्वे वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल-सीसी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अपघाताला जबाबदार असणाऱ्यांची निश्चिती करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
विशेष म्हणजे, अल-अय्यात जिल्ह्यात रेल्वे अपघात होण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात याच परिसरात दोन मालगाड्यांची धडक झाली होती. त्यावेळी एका रेल्वेचा चालक आणि त्याचा सहायक जखमी झाले होते. दुसरीकडे, केनियामध्येही नुकत्याच झालेल्या भीषण रस्ते अपघातात २२ जणांचा मृत्यू झाला होता. माकुएनी परिसरात बस आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाल्याने ही दुर्घटना घडली. बसमधील प्रवासी अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमावरून परतत असताना हा अपघात झाला. यामध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, याच महामार्गावर सुमारे तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या अन्य अपघातात १७ जणांना प्राण गमवावे लागले होते.