पत्नीशी विश्वासघाताची कबुली; जेनसन हुआंग यांच्यासमोर नवे संकट!

    दिनांक :09-Nov-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
The new crisis facing Jenson Huang जगप्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी एनव्हिडियाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेनसन हुआंग एका गंभीर प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी एका चिनी महिला व्यावसायिकाच्या हालचालींबाबत संशय व्यक्त केला आहे. या महिलेने जेनसन हुआंग यांच्याशी जवळीक निर्माण केली होती आणि तिचे चीनच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा संशय आहे. तसेच अमेरिकेची गोपनीय माहिती चीनपर्यंत पोहोचवण्याचे काम ती करत असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणात हुआंग यांनी संबंधित महिलेसोबत जवळचे वैयक्तिक संबंध असल्याची कबुली दिल्यानंतर एनव्हिडियाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत.
 

The new crisis facing Jenson Huang
 
 
वृत्तानुसार, जेनसन हुआंग यांनी कंपनीच्या संचालक मंडळासमोर संबंधित महिला व्यावसायिकासोबत अंतरंग संबंध असल्याचे मान्य केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी कंपनीला संदेश पाठवून आपल्या कृत्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. या संदेशात त्यांनी पत्नीशी विश्वासघात केल्याची कबुली देताना या प्रकारामुळे पत्नी आणि मुलांना मानसिक त्रास झाल्याचे म्हटले आहे. आपण केलेल्या कृतीचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही आणि त्याबद्दल मनापासून पश्चात्ताप होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या वैयक्तिक संबंधांमुळे आता कंपनीच्या प्रमुखांभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
या प्रकरणातील संबंधित महिलेची ओळख एलिस हुआंग अशी असून, ती हुआंग ली या नावानेही ओळखली जाते. ती मूळची चीनची नागरिक असून सिंगापूरमधील 'मेगास्पीड' या डेटा सेंटर कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना तिच्या चीनशी असलेल्या कथित संबंधांबाबत संशय आहे. अमेरिकेने प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय चिप्स चीनला मिळू नयेत यासाठी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, या निर्बंधांना चुकवून चीनला मदत करण्यामध्ये एलिस हुआंगची भूमिका असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर एनव्हिडियाचे प्रमुख आणि संबंधित महिलेतील जवळीक हा विषय अधिक संवेदनशील बनला आहे. मात्र, या आरोपांबाबत अद्याप अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. (इनपुट : एपी)