नाशिक
Temples Receive Threat Emails न्यायालये आणि बॉलीवूडमधील सेलिब्रिटींना धमक्या मिळण्याचे सत्र सुरूच असताना आता देवस्थानांनाही लक्ष्य करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर आणि सप्तशृंगी देवस्थानाला धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. या ई-मेलमधून दोन्ही देवस्थानांना नुकसान पोहोचवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. ऐन दिवाळीच्या काळात हा प्रकार उघडकीस आल्याने मंदिर परिसरात खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ई-मेल, मेसेज आणि फोन कॉलच्या माध्यमातून विविध महत्त्वाच्या ठिकाणांना धमक्या दिल्या जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती, तर बॉलीवूडमधील काही सेलिब्रिटींना खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याच्या घटना चर्चेत आहेत. आता या धमकीसत्रात देवस्थानांचाही समावेश झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर आणि सप्तशृंगी देवस्थानाला धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर दोन्ही ठिकाणच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त कडक करण्यात आला असून गस्तही वाढवण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. परिसरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याबरोबरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियमित निरीक्षण केले जात आहे.
याआधी सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयासह देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त झाले होते. महाराष्ट्रात ठाणे, पालघर, पुणे येथील शिवाजीनगर न्यायालय, नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर, अमरावती, बीड, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, सातारा आणि परभणी येथील न्यायालयांना अशा धमक्या देण्यात आल्या होत्या. तसेच गोव्यातील मडगाव जिल्हा व सत्र न्यायालय आणि उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयालाही धमकीचे ई-मेल आले होते.
न्यायालयांपासून आता देवस्थानांपर्यंत धमक्यांचे सत्र पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना आलेल्या धमकीच्या ई-मेलमुळे भाविकांमध्येही चिंता व्यक्त होत असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी पोलिसांकडून सतर्कता बाळगली जात आहे.