ऑस्ट्रेलियाच्या पतनाला कारणीभूत ठरणारा 'तो' फोट!

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |

aus
 
 
नवी दिल्ली,
Australia team failure वीस षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत यंदा सर्वाधिक चर्चा रंगली ती ऑस्ट्रेलियाच्या गट टप्प्यातील अनपेक्षित निर्गमनाची. २०२१ मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या या संघाची अवघ्या काही वर्षांत झालेली घसरण क्रिकेटविश्वासाठी धक्कादायक ठरली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विक्रमी यश मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मात्र वीस षटकांच्या प्रकारात सातत्य राखता आलेले नाही. स्पर्धेच्या दहा आवृत्त्यांपैकी केवळ एकदाच त्यांनी किताब जिंकला असून त्यानंतर कामगिरीत सातत्याने घसरण दिसून आली आहे.
 
 
australia team
 
२०२१ मधील यशानंतर घरच्या मैदानावर किताब राखण्यात अपयश आले. पुढील स्पर्धेत ते पुढील फेरीपलीकडे जाऊ शकले नाहीत आणि यंदा तर गट टप्प्यातूनच बाहेर पडावे लागले. झिम्बाब्वेकडून झालेला पराभव हा निर्णायक ठरला. संघ निवडीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले. दुखापतींच्या छायेतही पॅट कमिन्स, जोश हेझलवूड यांसारख्या खेळाडूंना प्रारंभी स्थान देण्यात आले, परंतु स्पर्धेआधी त्यांना वगळण्यात आले. स्टीव्ह स्मिथ यांचा उशिरा समावेश करण्यात आला, तरीही महत्त्वाच्या सामन्यात त्यांना अंतिम संघात स्थान मिळाले नाही. श्रीलंकेविरुद्ध चांगल्या सुरुवातीनंतर अचानक झालेली घसरण संघातील अस्थिरतेचे प्रतीक मानली जात आहे.
 
माजी यष्टिरक्षक इयान हीली यांनीही संघरचनेवर टीका केली. त्यांच्या मते, संघात शेवटच्या टप्प्यात वेग वाढवणारे फलंदाज भरपूर आहेत; मात्र डाव उभारू शकणाऱ्या खेळाडूंची कमतरता जाणवते. सातत्याने खेळाडूंची अदलाबदल झाल्याने संतुलन बिघडले. आकडेवारी पाहिली असता आणखी एक कारण स्पष्ट होते. १ जानेवारी २०२२ पासून ऑस्ट्रेलियाने वीस षटकांचे केवळ ७२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, जे प्रमुख संघांमध्ये सर्वात कमी आहेत. याच कालावधीत भारतने ११८, पाकिस्तानने १०६, तर इतर संघांनीही मोठ्या संख्येने सामने खेळले. या तुलनेत ऑस्ट्रेलियाने या प्रकाराला कमी प्राधान्य दिल्याचे चित्र दिसते. द्विपक्षीय मालिकांमध्येही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याची पद्धत कायम राहिल्याने संघातील सुसंवाद आणि स्थिरता कमी झाली. कसोटी आणि एकदिवसीय प्रकारात अजूनही ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व कायम असले तरी वीस षटकांच्या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर जागतिक क्रिकेटमधील त्यांची सर्वांगीण पकड सैल होऊ शकते. सध्याची घसरण हा त्यांच्यासाठी इशारा मानला जात असून, भविष्यातील पुनर्बांधणीसाठी हा टप्पा निर्णायक ठरू शकतो.