कॅनडाचा भारतासोबत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात नवा अध्याय!

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Canada's new chapter with India कॅनडाने भारतासोबत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याचा निर्णय घेतला असून याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो २०२६’मध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याची घोषणा करण्यात आली आहे. नवी दिल्लीतील कॅनडाच्या उच्चायुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, भविष्यातील अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या नवतंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांतील सहकार्य वाढवणे हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे. या प्रदर्शनात कॅनडातील अनेक तंत्रज्ञान कंपन्या तसेच वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
 

Canada 
 
कॅनडाचे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल नवोन्मेष मंत्री इव्हान सोलोमन १८ ते २१ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून ते भारतीय अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, नवउद्योग आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये व्यावहारिक भागीदारी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. या माध्यमातून कॅनडातील कंपन्यांना भारतातील संधी उपलब्ध होतील, गुंतवणुकीला चालना मिळेल आणि जागतिक पातळीवरील स्पर्धात्मक स्थान अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
 
ही परिषद भारत आणि कॅनडामधील नव्या सहकार्याच्या टप्प्याचे प्रतीक मानली जात आहे. पूर्वी जस्टिन ट्रूडो यांच्या कार्यकाळात दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले होते; मात्र आता तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून नव्याने संवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे. सौदी अरेबियातील दौऱ्यानंतर तसेच जर्मनीतील म्युनिक सुरक्षा परिषदेत सहभाग घेतल्यानंतर मंत्री सोलोमन भारतात येत असून, जागतिक पातळीवरील सहकार्याचा विस्तार करण्यावर त्यांचा भर असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारतासोबत हातमिळवणी करत कॅनडा दीर्घकालीन भागीदारीकडे वाटचाल करत असल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.