चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 3 कोटी 75 लाखांचे बक्षीस

‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ मध्ये उत्कृष्ट कामगिरी

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
चंद्रपूर,

Gram Panchayats ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ मध्ये राज्यातील 27 हजार 895 ग्रामपंचायतींचा सहभाग होता. चंद्रपूर जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायतींनीही या अभियानात भाग घेतला. केवळ भाग घेतला नाही, तर या ग्रामपंचायतींनी राज्य व विभागस्तरावर चांगली कामगिरी केली. उंच उडी आणि भुमी थिमॅटीकच्या पुरस्कार श्रेणीत अगे्रसर राहून तब्बल 3 कोटी 75 लाखांचे बक्षीस प्राप्त केले.

My Vasundhara campaign 5.0  
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 1 एप्रिल 2024 ते 31 मे 2025 या कालावधीत पृथ्वी, जल, वायु, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा 5.0’ हे अभियान राबविण्यात आले. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने 17 फेब्रुवारी 2026 रोजी शासन निर्णयाद्वारे यातील उच्चत्तम कामगिरी करणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थाची नावे घोषित केली. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी राज्यस्तरावर तसेच विभाग स्तरावर उत्तुंग कामगिरी करीत पुरस्कार प्राप्त केले. राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार सावली तालुक्यातील जिबगाव ग्रामपंचायत (75 लाख रुपये), चिखली ग्रामपंचायत (1 कोटी रुपये), विभागस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर ग्रामपंचायत (50 लाख रुपये), मूल तालुक्यातील भेजगाव ग्रामपंचायत (50 लाख रुपये), उंच उडी पुरस्कार चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर ग्रामपंचायत (50 लाख रुपये), भुमी थिमॅटिक पुरस्कार सावली तालुक्यातील चिखली ग्रामपंचायत (50 लाख रुपये) असे एकूण 3 कोटी 75 लक्ष रुपयांचे पुरस्कार पटकाविले आहे.
 
 
 
जिल्ह्याकरिता ही निश्चितच अभिमानाची बाब आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं), गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांचेदेखील कौतुक केले. पृथ्वी, जल, वायु, अग्नी, आणि आकाश या निर्सगाच्या संबंधित पंचतत्वांच्या रक्षणासाठी आम्ही सदैव कटीबध्द असून, त्याकरिता माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत जिल्ह्यातील 100 टक्के ग्रामपंचायतीची नोंदणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.