गोंदिया,
Sundarnagar police action जिल्ह्यात अंमली पदार्थांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने सुंदरनगर परिसरात धाड टाकत एमडी (मेफेड्रोन) विक्रीसाठी फिरणार्या एका तरुणाला अटक केली. आरोपीकडून 7.310 ग्रॅम एमडीसह एकूण 1 लाख 46 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात एमडीची विक्री, वापर, साठा व वाहतूक करणार्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार 15 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हा हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गोंदिया शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुंदरनगर परिसरात एक इसम एमडी विक्रीच्या उद्देशाने फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सुंदरनगर येथे सापळा रचला. आरोपी तौसिफ उर्फ पिरू मुस्ताक शेख (24), रा. सुंदरनगर, ता. जि. गोंदिया याला त्याच्या घरासमोरील रस्त्यावर पंचासमक्ष ताब्यात घेऊन अंगझडती करण्यात आली. झडतीदरम्यान आरोपीकडील दोन पारदर्शक प्लास्टिक झिप्पर पाऊचमध्ये एकूण 7.310 ग्रॅम एमडी आढळून आला. सदर मुद्देमालाची अंदाजे किमत 1 लाख 46 हजार 200 रुपये आहे. पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. प्राथमिक चौकशीत आरोपीने सदर एमडी विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक धीरज राजूरकर यांच्या तक्रारीवरून एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क) व 22(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, सपोनि धीरज राजूरकर, पोहवा संजय चौहान, सहायक फौजदार राजू मिशा, पोहवा सुजित हलमारे, पोहवा सोमेन्द्रसिंग तुरकर, पोशि छगन विठ्ठले, पोशि राकेश इंदूरकर, पोशि सुनील डहाके, पोशि संतोष केदार व चापोशी घनश्याम कुम्भलवार यांनी पार पाडली.