अतिरिक्त इंधनामुळे स्फोट? रोहित पवारांचा धक्कादायक दावा

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
पुणे,
Rohit Pawar's shocking claim रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत गंभीर आणि धक्कादायक आरोप मांडले. ही दुर्घटना नैसर्गिक अपघात नसून ती जाणीवपूर्वक घडवून आणली गेल्याची ठाम शंका त्यांनी व्यक्त केली. विमानात आवश्यकतेपेक्षा अधिक इंधन साठवण्यात आल्यामुळेच मोठा स्फोट झाला असावा, असा दावा त्यांनी पुराव्यांच्या आधारे केला. मुंबईहून उड्डाण करताना विमानात इंधन भरले गेले होते. पुढील प्रवासात इतर ठिकाणीही इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध असताना अतिरिक्त इंधन का नेण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
 
rohit pawar
विशेषतः शौचालयाच्या मागील भागात वेगळ्या डब्यांत इंधन साठवण्यात आले होते आणि त्याच परिसरात उड्डाण नोंद यंत्र ठेवले जाते, असे ते म्हणाले. या ठिकाणी प्रथम आग लागली आणि नंतर पंख्यातील इंधन पेटले असावे, अशी त्यांची शंका आहे. विमानाच्या नोंदणी क्रमांकाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. अपघातापूर्वी तो क्रमांक स्पष्ट दिसत नव्हता; मात्र आगीच्या घटनेनंतर तो उठून दिसू लागला, असे त्यांनी सांगितले. संबंधित क्रमांक हा परदेशी नोंदणीचा असल्याचा दावा करत त्यांनी नोंदणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप केला. काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे नोंदणीकरण करण्यात आल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
 
उड्डाण नोंद यंत्र अत्यंत उष्णतेलाही तग धरण्यास सक्षम असते, तरी ते पूर्णतः नष्ट झाल्याचे सांगितले जात असल्याने छेडछाड झाली असावी, असे रोहित पवार म्हणाले. घटनास्थळी अनेक कागदपत्रे न जळालेल्या अवस्थेत दिसली, तर विमानाचा काही भागही पूर्णतः वितळलेला नव्हता, यावरून अधिक चौकशीची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तपास प्रक्रियेला होत असलेल्या विलंबावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अल्पावधीत अहवाल येऊ शकतो, तरी तो का जाहीर होत नाही, याबाबत त्यांनी संशय व्यक्त केला. या प्रकरणातील काही व्यक्तींना संरक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे का, असा थेट सवाल त्यांनी केला. दरम्यान, संबंधित विमान कंपनीशी सत्ताधाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला. अपघातानंतरही त्या कंपनीची सेवा सुरूच का आहे आणि तिच्यावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संबंधित कंपनीच्या प्रमुखांशी काही प्रभावशाली व्यक्तींचे व्यावसायिक संबंध असल्याचा दावा करत या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, तसेच कंपनीवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.