माळेगाव साखर कारखान्यात सुनेत्रा पवार यांची बिनविरोध!

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
माळेगाव,
Sunetra Pawar at Malegaon Sugar Factory दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ‘ब’ वर्ग मतदार संघातील संचालकपदासाठी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली. संचालक मंडळाच्या विशेष सभेत हा निर्णय घेण्यात आला. निवडणूक प्रक्रिया प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अधिपत्याखाली पार पडली. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्जावर ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे यांनी सुचक म्हणून स्वाक्षरी केली, तर संचालक तानाजी कोकरे यांनी अनुमोदन दिले. एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.
 

Sunetra Pawar at Malegaon Sugar Factory 
 
सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे कारखान्याच्या पुढील वाटचालीबाबत उत्सुकता वाढली असून, अध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामती तालुक्यातील सहकार क्षेत्रात या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रसंगी माळेगावच्या उपाध्यक्षा संगीता कोकरे, योगेश जगताप, नितीन सातव, अविनाश देवकाते, विजय तावरे, शिवराज जाधवराव, नितीन शेंडे, ज्योती मलमुले, राजेंद्र बुरुंगले, रामदास आटोळे, गणेश खलाटे, प्रताप आटोळे, रतन भोसले, सतीश फाळके, देविदास गावडे, स्वप्निल जगताप, विशाल जगताप, कामगार संचालक अनिल जगताप तसेच कार्यकारी संचालक अशोक पाटील यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे यांनी सांगितले की, अजित दादांच्या स्वप्नातील कारखाना पुढे नेण्यासाठी त्यांच्या वारशाला न्याय देणारे नेतृत्व आवश्यक आहे. त्यामुळे सर्व संचालक मंडळाने सुनेत्रा पवार यांची ‘ब’ वर्ग मतदारसंघातून संचालक म्हणून बिनविरोध निवड केली. पुढील आठवड्यात होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्यांची अध्यक्षपदी निवड व्हावी, अशी शेतकरी व सभासदांची तीव्र इच्छा आहे.