पोहण्याच्या जत्रेतील पारंपारिक लोककला हरपली

२० दिवस भरणारी जत्रा पाच दिवसांवर

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
बाळू मुंगले
वडनेर
traditional folk art जत्रा म्हटली की, पूर्वी ढोलकीचा ताल अन् ठेका. लावणीचा ताल अस्सल मराठी ढोलकी व लावणीचा तोडा. मात्र, पोहण्याच्या महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रेतील तमाशा आणि लावणीच्या फडाचा नाद हरवला असून प्रेक्षकांची खूप नाराजी असल्याने कधीकाळी २० दिवसापर्यंत चालणारी ही जत्रा अवघ्या ५ दिवसातच उलटून पडत आहे.
 
 

traditional folk art 
 
 
गावागावातील प्रसिद्ध जत्रा -यात्रा महाराष्ट्रासह वर्धा जिल्ह्यात सुद्धा आजही प्रसिद्धीस आहे. आख्यायिकीनुसार, वर्धा जिल्ह्यात शेकडो वर्षांपूर्वी वाकाटककालीन पवन राज्याचे पवनार, पवनी आणि पोहणा येथे वास्तव्य होते. वर्धा नदीच्या तिरापासून काही अंतरावर वसलेले पोहणा येथील महारुद्रेश्वर मंदिर ऐतिहासिक साक्ष आहे. महाशिवरात्री निमित्ताने येथे भरणार्‍या जत्रेत पुरातन काळापासून सांस्कृतिक ठेवा जपला जात होता. मात्र, अलीकडच्या काळात लुप्त झालेला आहे. पूर्वी या जत्रेचे नियोजन पारंपरिक पद्धतीने असायचे. या जत्रेच्या माध्यमातून सर्वात मोठी व आर्थिक उलाढालीची यात्रा म्हणून पोहणा यात्रेची ओळख होती.
सुगीचे दिवस संपल्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागताच पालझाडीच्या थंडीचा आनंद लुटण्यासाठी शेतकरीवर्गास यात्रांचे वेध लागून वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूरसह दूरवरून येणारे असंख्य रसिक प्रेक्षक पोहणा यात्रेच्या माध्यमातून लोककलेचा आनंद लुटत असत. पंचक्रोशीतील गावखेड्यातील नागरिक बैलबंडीसह खानपानाचे साहित्य सोबत घेत कुटुंबांसह दोन दिवस मुकाम ठोकून जत्रेचा आनंद घेत होते. येथील यात्रेत मुख्य आकर्षण होते ते तमाशा आणि लावणीच्या फडाचे.
काही वर्षांपूर्वी तमाशा आणि लावणी प्रेमी रसिक प्रेक्षकांच्या मागणी व आवडीने येथे तमाशाचे अनेक फड येत असत. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने या तमाशा फडाला मोठी गर्दी प्रेक्षकांची होत असे. तमाशाच्या ढोलकीच्या ठेयावर व लावणीच्या तालावर येथील रसिक प्रेक्षक ठेका धरत असत. महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध तमाशा फडांनी पोहणा येथील महारुद्रेश्वर यात्रेच्या निमित्ताने तमाशा आणि लावणी कलावंतांनी लोककलेची अदाकारी येथे रसिक प्रेक्षकांना सादर केलेली आहे. मात्र, कुठे काय बिनसले, पोहणा येथील यात्रेतील तमाशा व लावणीचा फड गेल्या काही वर्षांपासून हद्दपार झाला.traditional folk art परिणामी, कधीकाळी २० दिवस चालणारी ही जत्रा अवघ्या चार-पाच दिवसातच उलटली जात आहे.
सांस्कृतिक लोककलेची मागणी या जत्रेच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांनी केलेली आहे. परंतु, काहींच्या गैर मागण्याने आणि काहींच्या नाहक त्रासाने सुरक्षित भावना नसल्याने येथे ही लोककला सादर होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. कोणीतरी पुढाकार घेऊन पुन्हा पोहणा येथील श्री महारुद्रेश्वर यात्रेत लोककलेच्या परंपरेचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना मिळावा, अशी मागणी होत आहे.