सिलेंडर स्फोटानंतर भीषण आग

सुरक्षा साधनांच्या अभावावर प्रश्नचिन्ह

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद,
Pusad gas cylinder blast, शहरातील मातोश्री विठाबाई मारोतराव ट्रस्ट, गीताई केंद्राच्या स्टोरेजला गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली. यामुळे परिसरात काही वेळेसाठी भीतीचे वातावरण पसरले होते.सूत्रांनुसार, या स्टोरेजमध्ये विविध साहित्याबरोबर, तीन एलपीजी सिलेंडर ठेवण्यात आले होते. त्यापैकी एका सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने आग वेगाने पसरली. घटनेची माहिती मिळताच, पुसद अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
 

 Pusad gas cylinder blast, 
लीडिंग फायरमन राजेश शेकापुरे, वाहनचालक पवन पवार, सारंग सानप, रवी नेटके, फायरमन अमन आत्राम, योगेश नेमाडे यांनी जिवाची पर्वा न करता आगीमध्ये प्रवेश करून जवळपास एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. विशेष म्हणजे स्फोट होऊ शकण्याच्या स्थितीत असलेले दोन जिवंत सिलिंडर बाहेर काढून मोठा अनर्थ टाळण्यात आला. या आगीत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेदरम्यान एक गंभीर बाब प्रकर्षाने समोर आली की, आगीच्या ठिकाणी प्रवेश करताना अनेक कर्मचाèयांकडे फायर प्रॉक्सिमिटी सूट, श्वसनासाठी ऑक्सिजन सिलिंडर व सुरक्षा मास्क उपलब्ध नसल्याचे दिसून आले. परिणामी धुरामुळे कर्मचाèयांचे डोळे लाल होणे व श्वसनास त्रास होणे अशी स्थिती निर्माण झाली.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. संपूर्ण शहराचे रक्षण करणारे अग्निशमन कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत असताना, त्यांना मूलभूत संरक्षण साधनेच उपलब्ध नसणे ही चिंतेची बाब असल्याचे मत नागरिकाकडून व्यक्त होत आहे.

अत्यावश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध आहे का ?
आग विझवणारे कर्मचारी निष्काळजी न करता, उपलब्ध साधनांवर काम करत आहेत. आवश्यक सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून देणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे. धोकादायक स्थितीत कर्मचाèयांना अपुरी साधने देऊन काम करवून घेणे म्हणजे त्यांच्या धाडसावर अवलंबून राहणे ठरते, सुरक्षा व्यवस्थेवर नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. या घटनेनंतर शहरातील अग्निशमन दलाला अत्यावश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध आहे का, असल्यास प्रत्यक्ष वापरात का नाही आणि नसल्यास जबाबदारी नेमकी कोणाची, हे प्रश्न आता अधिक तीव्र झाले आहेत.