जागतिक राजकीय तणाव...सेन्सेक्स १२३६ अंकांनी कोसळला

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Sensex falls by 1236 points मुंबईतील शेअर बाजारात आज जोरदार घसरण झाली. सेन्सेक्स १२३६ अंकांनी कोसळून ८२४९८.१४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० निर्देशांक ३६५ अंकांनी घसरून २५४५४.३५ वर पोहोचला. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य ४७२ लाख कोटींवरून ४६४ लाख कोटींवर आले. बीएसई १५० मिडकॅप निर्देशांक १.५४ टक्क्यांनी आणि बीएसई २५० स्मॉलकॅप निर्देशांक १.१६ टक्क्यांनी घसरला. बाजार विश्लेषकांच्या मते, शेअर बाजारातील या घसरणीचे मुख्य कारण जागतिक भू-राजनैतिक तणाव आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य संघर्षामुळे गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत. मध्य पूर्वातील आखाती देश जगभराला कच्च्या तेलाचा पुरवठा करतात. स्ट्रेट ऑफ हॉहमुज ही निर्यातीत महत्त्वाची मार्गिका आहे आणि येथे अडथळा निर्माण झाल्यास तेलाचे दर वाढू शकतात, ज्यामुळे जागतिक महागाई आणि शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
 
 
Sensex falls
 
शेअर बाजारातील घसरणीचा आणखी एक प्रमुख कारण कच्च्या तेलाच्या दरात वाढ होणे आहे. संभाव्य तणावामुळे ब्रेंट क्रूडचा दर ७० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे भारतासारख्या तेल आयातदार देशावर मोठा आर्थिक ताण येऊ शकतो. ताज्या घसरणीमुळे बँकिंग क्षेत्रातील शेअर्सवरही दबाव दिसून आला. कोटक महिंद्रा बँक, एक्सिस बँक, इंडसइंड बँकच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तसेच श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स आणि एसबीआय लाईफ इन्शुरन्सच्या शेअर्समध्येही घसरण नोंदवली गेली. गेल्या तीन दिवसांच्या तेजीनंतर नफा वसूल करण्याचा ट्रेंड बाजारात दिसला असून, या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.