तभा वृत्तसेवा
शेंबाळपिंपरी,
Shenbalpimpri Pusad fake liquor raid, पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील परवाना असलेल्या देशी दारू दुकानावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून मोठा बनावट देशी दारू साठा जप्त केला.राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या सोमवारच्या धडक कारवाईमध्ये बनावट देशी दारूच्या 1488 बाटल्या, बनावट दारू निर्मिती करण्यासाठी लागणारे साहित्य, मोबाईल, असा 2 लाख 1 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल व तिघांवर कारवाई करण्यात आली.
रमेश पापय्या पुल्लम (47, रियल ता. सिद्धीपेठ तेलंगण), प्रशांत सारय्या चेपयाला (वय 28, बेजन्की, तेलंगण), शुभम प्रवीण जैस्वाल (वय 33, अकोलाबाजार, ता. जि. यवतमाळ) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त पराग नवले, अधीक्षक नितेश शेंडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पुसद उपनिरीक्षक अनिल पिकले, दुय्यम निरीक्षक सुकेशिनी शिंदे, पंजाब राठोड, महेंद्र रामटेके, वाघजी बोंबले, पूनम गटलेवार, प्रतीक कोतुरवार यांनी केली. बनावट दारूचा कारखाना दुकानच्या गोदामातच आढळला. त्यात 10 हजारांच्या वर बनावट लेबल, बनावट बूच, रिकामे खोके व इतर साहित्य आढळून आले. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क अधिकारी करीत आहेत.