भारताशी युद्धाची शक्यता नाकारता येत नाही!

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे विधान

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Statement by Pakistan's Defense Minister पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान भारत भेटीवर आले आहेत. दिल्ली आणि मुंबई येथे त्यांच्या विविध अधिकृत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका परदेशी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारताविषयी तीव्र विधाने केली आहेत. आसिफ यांनी दावा केला की भारत आणि अफगाणिस्तान मिळून पाकिस्तानविरोधात छुपे युद्ध छेडत आहेत. त्यांच्या मते नवी दिल्ली आणि काबूल यांची धोरणे एकमेकांशी सुसंगत असून पाकिस्तानला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारताशी थेट संघर्षाची शक्यता पूर्णपणे फेटाळता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले आणि याबाबत चिंता व्यक्त केली.
 
 
Pakistan
 
या आरोपांवर भारताकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र दक्षिण आशियातील सुरक्षा परिस्थिती आधीच संवेदनशील असताना अशा प्रकारची विधाने प्रादेशिक वातावरण अधिक तापवणारी ठरू शकतात, असे जाणकारांचे मत आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे तणाव वाढत गेला आहे. सीमावाद, दहशतवाद आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे विधान पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले असून पुढील राजनैतिक घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.