दारू दुकानाविरोधात ग्रामस्थांचा संताप

यज्ञ करून प्रशासनाला दिला अल्टिमेटम

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
आमगाव,
Amgaon, येथील नगर परिषद हद्दीतील किडंगीपार परिसरात शिवणी मार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या देशी दारू दुकान व बिअर बारच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गुरुवार 20 फेब्रुवारी रोजी महिला, पुरुषांसह मुलांनीही दारू दुकानासमोर दारू दुकान बंद करा अशा जोरदार घोषणा देत भगवान शंकराच्या प्रतिमेसमोर यज्ञ करून तीव्र निषेध नोंदविला. यानंतर पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाला इशारा देण्यात आला.
 

Amgaon, Kidangipar, Alcohol Shop Protest, 
ग्रामस्थांनी यापूर्वी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांना लेखी निवेदन दिले होते. त्यांनी दोन-तीन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पत्रकार परिषदेत दारू दुकान बंद करा अभियानाचे प्रमुख संतोष दोनोडे, माजी सरपंच घनश्याम मेंढे, सेवंता भांडारकर, ममता पाउलझगडे, रामदास गायधने, राजेंद्र मेंढे, चुनेश्वरी हरिणखेडे, रमेश गायधने, ईश्वर बहेकार, शुभम भांडारकर, इंद्रकुमार हत्तीमारे आदींसह बहुसंख्येने महिला, पुरुषांसह मुलीमुले उपस्थित होते. किडंगीपार गावात मजूर वर्गाचे प्रमाण अधिक आहे. हे मजूर दररोज आमगाव येथे कामासाठी जातात. गावातच दारू दुकान सुरू झाल्यास व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढेल, कुटुंबांत कलह निर्माण होईल आणि आर्थिक परिस्थिती बिघडेल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस अधीक्षक, तहसीलदार कार्यालय, पोलीस निरीक्षक तसेच मुख्याधिकारी नगर परिषद आमगाव यांना निवेदनाच्या प्रती सादर केल्या आहेत.दरम्यान, दुकान जबरदस्तीने बंद करण्याचा निर्णय सध्या स्थगित ठेवत ग्रामस्थांनी प्रतीकात्मक दारू दुकान बंद करा यज्ञ केला आहे. मात्र 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रशासनाने निर्णय न घेतल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
चौकट..
शाळेजवळ दारू दुकान; अपघात व सुरक्षेची भीती
रिसामा येथील अतुल जायसवाल यांनी 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता दारूने भरलेले वाहन आणून शिवणी मार्गावर नवीन देशी दारू दुकान सुरू केले. हे दुकान मुख्य रस्त्यावर व गावाच्या अगदी जवळ असून शेजारीच शाळा आहे. परिसरात पार्किंगची कोणतीही सोय नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. दररोज मोठ्या संख्येने मुली सायकलने शाळेत ये-जा करतात. नशेत असलेल्या व्यक्तींमुळे त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.